Sonam Maskar | सोनम मस्कर यांच्या यशाने कोल्हापूरच्या क्रीडाविश्वाचा गौरव

पालकमंत्री आबिटकर यांचे गौरवोद्‍गार; जिल्‍हा प्रशासनातर्फे सत्‍कार
कोल्‍हापूर : आशियाई क्रीडा स्‍पर्धेतील यशाबद्दल सोनम मस्‍कर यांचा सत्कार करताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर. यावेळी बाळ पाटणकर, सुहास पाटील, सुमन मस्‍कर, उत्तम मस्‍कर, राधिका बराले,  अब्‍दुलहमीद मिरशिकारी, रोहित हावलदार आदी.
कोल्‍हापूर : आशियाई क्रीडा स्‍पर्धेतील यशाबद्दल सोनम मस्‍कर यांचा सत्कार करताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर. यावेळी बाळ पाटणकर, सुहास पाटील, सुमन मस्‍कर, उत्तम मस्‍कर, राधिका बराले, अब्‍दुलहमीद मिरशिकारी, रोहित हावलदार आदी. (छाया : पप्‍पू अत्तार)
Published on: 
Updated on: 

कोल्‍हापूर : आशियाई क्रीडा स्‍पर्धेत सोनम मस्‍कर यांनी मिळविलेल्‍या यशाने कोल्‍हापूरच्‍या क्रीडाविश्‍वाच्‍या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, असे गौरवोद्‍गार पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले.

सोनम मस्‍कर यांनी १० मीटर एअर रायफल शूटिंग प्रकारात रौप्‍यपदक पटकावल्‍याबद्दल त्यांचा जिल्‍हा प्रशासनातर्फे सत्‍कार करण्‍यात आला. याप्रसंगी आबिटकर बोलत होते. पालकमंत्री आबिटकर म्‍हणाले, कोल्‍हापूरच्‍या क्रीडाविश्‍वाला मोठा इतिहास आणि संस्‍कृती आहे. खाशाबा जाधव यांच्‍यापासून आता सोनम मस्‍कर यांच्‍यापर्यंत अनेकांनी आपल्‍या यशाने कोल्‍हापूरच्‍या क्रीडा विश्‍वाच्‍या यशात भर टाकली आहे. सोनमच्‍या यशात मस्‍कर कुटुंबाचे योगदान आणि मोठा त्‍याग आहे. कोल्‍हापूरच्‍या क्रीडाविश्‍वाचा वारसा जपण्‍यासाठी गाव तेथे क्रीडांगण ही संकल्‍पना अधिक प्रभावीपणे राबविण्‍यात येईल.

सत्‍कारास उत्तर देताना सोनम मस्‍कर म्‍हणाल्‍या, या यशाने आणि कोल्‍हापूरच्‍या सत्‍काराने माझी जबाबदारी वाढली आहे. त्‍यामुळे यापुढे अधिकाधिक प्रभावीपणे सातत्‍य राखण्‍याचा प्रयत्‍न केला जाईल. कार्यक्रमास क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, बाळ पाटणकर, राष्‍ट्रीय नेमबाज अब्‍दुलहमीद मिरशिकारी, प्रशिक्षक राधिका बराले, रोहित हावलदार, सोनमच्‍या आई सुमन मस्‍कर, वडील उत्तम मस्‍कर यांच्‍यासह मान्‍यवर उपस्‍थित होते.

उपमुख्‍यमंत्री सुनेत्रा पवारांकडून कौतुक

कार्यक्रम सुरू असताना क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांना उपमुख्‍यमंत्री सुनेत्रा पवार यांचा फोन कॉल आला. फोनवरून पवार यांनी सोनमशी संवाद साधला. सोनमचे अभिनंदन करून यापुढे प्रत्‍येक टप्‍प्‍यावर खंबीरपणे पाठीशी राहण्‍याची ग्‍वाही पवार यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news