कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात बुधवारी चार अपघातांत तरुणीसह सहाजणांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी आहेत. गांधीनगरजवळ मसुटेमळ्यात लिफ्ट दुरुस्त करताना दोन कर्मचार्यांचा मृत्यू झाला. चिपरीजवळ दोन दुचाकींच्या धडकेत मुख्याध्यापकासह दोघांचा अंत झाला असून, दोघे गंभीर जखमी आहेत. परिते (ता. करवीर) येथे रस्ता ओलांडताना वृद्धेचा, तर शिये फाट्यावर दुचाकी घसरल्याने रस्त्यावर पडल्यावर डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने न्यायालयीन कर्मचारी तरुणीचा बळी गेला. या अपघातांमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
अत्तराच्या गोदामातील लिफ्ट कोसळून दोन कामगार ठार झाले. गांधीनगरमध्ये बुधवारी (दि. 8) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. महेश जेम्स कदम (वय 47, रा. राजारामपुरी 4 थी गल्ली, टाकाळा) आणि किशोर बाबू गायकवाड (60, रा. मणेरमळा) अशी मृतांची नावे आहेत. घटनेची नोंद गांधीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिस आणि प्रत्यक्षदर्शीने दिलेली माहिती अशी, महेद्रसिंह रजपूत यांचे गांधीनगरजवळील मसुटेमळा येथे अत्तराचे गोदाम आहे. या गोदामातील मालवाहतूक करणारी लिफ्ट एक महिन्यापासून बंद आहे. महेश कदम, किशोर गायकवाड आणि सचिन महादेव सुतार हे तिघे बुधवारी लिफ्ट दुरुस्त करण्यासाठी गेले होते. त्यांनी दुपारी अडीच वाजता तिसर्या मजल्यावर लिफ्ट दुरुस्तीचे काम सुरू केले. कदम आणि गायकवाड हे दोघे लिफ्टच्या टपावर बसून दुरुस्तीचे काम करीत होते, तर सुतार हे या दोघांना मदत करीत होते.
काम सुरू असतानाच अचानक वरील हूक तुटल्याने लिफ्ट वेगाने खाली जाऊन जमिनीवर आदळली. त्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठा रक्तस्राव झाला. दोघांनाही मारुती व्हॅन आणि टेम्पोतून उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला. गायकवाड आणि कदम यांचे मृतदेह सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आलेे. मृतदेह पाहताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला.
नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. रात्री उशिरापर्यंत सीपीआरच्या शवविच्छेदन कक्षाजवळ नातेवाईकांसह मित्रमंडळींची गर्दी होती. अपघाताची माहिती देताना प्रत्यक्षदर्शी सचिन सुतार अत्यंत भावुक झाला. महेश कदम हा लिफ्ट दुरुस्तीसह पडेल ते काम करून कुटुंबाचा चरितार्थ चालवीत असे. महेश आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी अशा परिवारासह टाकाळा परिसरात राहत होता. किशोर गायकवाडही मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करत होता. गायकवाड यांच्या मागे पत्नी दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील चिपरी (ता. शिरोळ) येथे दोन दुचाकींत झालेल्या अपघातात मुख्याध्यापक महावीर धनपाल शिरढोणे (56 रा. शेडशाळ ता. शिरोळ) व सलमान हसीम महाबरी (23, रा. कवठेसार, ता. शिरोळ) या दोघांचा मृत्यू झाला, तर सद्दाम शकील फकीर (23 रा. कवठेसार) व राजेंद्र बापू लाड (55 रा. शेडशाळ) हे दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसांत झाली नव्हती.
बुधवारी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास सांगली-कोल्हापूर मार्गावरून सलमान महाबरी आणि सद्दाम फकीर हे मोटारसायकलवरून तारदाळ येथे निघाले होते, तर महावीर शिरढोणे व राजेंद्र बापू लाड हे दोघेजण शाळेच्या कामानिमित्त कोल्हापूरला गेले होते. चिपरी येथील महामार्गावर दोन मोटारसायकलींमध्ये अपघात झाला. यामध्ये महाबरी आणि शिरढोणे गंभीर जखमी झाल्याने त्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
फकीर आणि लाड यांना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. महावीर शिरढोणे हे कुरुंदवाड येथील सानेगुरुजी शिक्षण संस्थेच्या अभिनव प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, तर शेडशाळच्या सरपंच पुष्पा शिरढोणे यांचे पती होते. अपघातानंतर शेडशाळ व कवठेसार येथील नागरिकांनी सांगली सिव्हिल रुग्णालयात गर्दी केली होती. रात्री उशिरा उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
कौलव; पुढारी वृत्तसेवा : परिते (ता. करवीर) येथे रस्ता ओलांडत असताना भरधाव लक्झरी बसने धडक दिल्यामुळे अंजनी रंगराव पाटील (77) या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली. अंजनी पाटील या बैठकीसाठी जात होत्या. परिते बसथांब्याजवळ रस्ता ओलांडत असताना कोल्हापूरहून राधानगरीकडे जाणार्या लक्झरी बसने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की, त्यांच्या मृतदेहाचे दोन भाग झाले होते. गावच्या प्रवेशद्वारातच अपघात झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली; मात्र ग्रामस्थांनी ये-जा करणार्या वाहनांना एकेरी मार्ग रिकामा करून दिला.