Former Sarpanch Mahesh Pilankar's Missing Case | पाटगाव माजी सरपंचांच्या शोधासाठी ‘एसआयटी’

पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांचा निर्णय; लवकरच शोध
Former Sarpanch Mahesh Pilankar's Missing Case
Former Sarpanch Mahesh Pilankar's Missing Case | पाटगाव माजी सरपंचांच्या शोधासाठी ‘एसआयटी’
Published on
Updated on

कोल्हापूर : पाटगाव (ता. भुदरगड) येथील माजी सरपंच महेश दिनकर पिळणकर हे दि. 7 जानेवारीपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी ‘एसआयटी’ स्थापन करण्याचा निर्णय पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी सोमवारी घेतला. ‘एसआयटी’मार्फत तपास प्रक्रियेला सुरुवात होत आहे.

लोकशाही व संविधान हक्क संरक्षण समिती आणि पिळणकर कुटुंबीयांनी सोमवारी सकाळी दसरा चौकात निदर्शने करून पोलिस अधीक्षक गुप्ता यांना निवेदन सादर केले. पाटगावचे माजी सरपंच पिळणकर हे दि. 7 जानेवारीला सायंकाळी मित्राकडे जेवायला जातो, असे सांगून घरातून दुचाकीवरून बाहेर पडले. त्यानंतर पिळणकर घराकडे परतले नाहीत. दुसर्‍या दिवशीही नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. जंगलात त्यांची दुचाकी सापडली. मात्र, दोन महिन्यांपासून माजी सरपंचांचा ठावठिकाणा लागला नाही.

मोबाईल मिळाला नाही. जंगलात दुचाकीपासून काही अंतरावर राख आणि काही अवशेष मिळून आले. त्याचा फॉरेन्सिकचा अहवाल स्पष्ट नाही. त्यांना जंगली श्वापदांनी पळविले की त्यांचा घातपात झाला? याबाबत काहीच माहिती मिळत नाही. पोलिसांचा तपास थंडावला आहे. ठोस माहिती समोर येत नाही. लोकशाही व संविधान हक्क संरक्षण समितीसह पिळणकर कुटुंबीयांनी सोमवारी पोलिस अधीक्षक गुप्ता यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी याबाबत ‘एसआयटी’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी झालेल्या चर्चेत महेश पिळणकर यांच्या पत्नी तृप्ती पिळणकर, मुलगा पारस पिळणकर, सतीशचंद्र कांबळे यांनी भाग घेतला.

पोलिसांना सापडेना तपासाची दिशा

गारगोटी : पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या बेपत्ता प्रकरणात पोलिसांना तपासाची ठोस दिशा न सापडल्याने हे प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. यामुळे पिळणकर कुटुंबीयांसह भुदरगड तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव— नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे.

महेश यांची दुचाकी सापडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या जंगलात जळीत राख आढळून आली होती. घटनास्थळी राख तसेच काही अवशेष पोलिसांना मिळाले होते. हे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र डीएनए अहवालातून कोणताही ठोस निष्कर्ष न निघाल्याने तपास पुन्हा शून्यावर आला आहे. राखेमध्ये एक दात सापडल्याची माहिती समोर आली. हा दात मानवाचा की एखाद्या प्राण्याचा, याबाबत स्पष्टता होईल आणि तपासाला दिशा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र कोणताही निष्कर्ष निघाला नाही. पिळणकर गायब प्रकरण घडून तब्बल दोन महिने लोटले. अद्याप भुदरगड पोलिसांना यामध्ये यश आले नाही. त्यामुळे कुटुंबीयासह तालुकावासीयांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news