

तानाजी खोत
कोल्हापूर : ‘प्रत्येक संकटाच्या अंती शेवट गोड ठरलेला असतो,’ असे म्हणतात हेच खरे. जागतिक बाजारातील मंदीचे सावट आणि भू-राजकीय तणावामुळे असेच संकट भारतीय शेअर बाजारावरही घोंघावत होते. अशा परिस्थितीत भारतीयांनी छोट्या छोट्या गुंतवणुकीच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेला सावरलेच नाही, तर आत्मनिर्भरतेच्या वाटेवर नवा इतिहास रचला. सोबतच, भारतीय शेअर बाजार आता परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या भरवशावर अवलंबून नसल्याचा संदेशही दिल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून तब्बल ५ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी काढून घेतला. या संकटात देशाचा खरा ‘तारणहार’ ठरला तो सामान्य मध्यमवर्ग. सामान्यांच्या सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) ने इतिहासाची पुनरावृत्ती टाळून शेअर बाजाराला स्वयंसिद्धतेचा नवा मार्ग दाखवला.
देशातील आर्थिक साक्षरतेच्या क्रांतीमुळे आज ग्रामीण व निमशहरी भागातील पगारदार, छोटे व्यावसायिक आणि तरुण पिढी दरमहा अवघ्या ५०० रुपयांपासून एसआयपी करीत आहेत. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे म्युच्युअल फंड उद्योगात दरमहा तब्बल ३० हजार कोटींहून अधिक निधी जमा होत आहे. मध्यमवर्गाने मंदीच्या वादळात देशाची आर्थिक नौका सुखरूप किनाऱ्याला लावत परदेशी पैशांची हुकूमशाही मोडीत काढत, एसआयपीधारकांनीदेशाची अर्थव्यवस्था तारली आहे.
आकडे सांगतात
30,594 कोटी : दरमहा ‘एसआयपी’चा प्रवाह
8.7 कोटी : एकूण ‘एसआयपी’ खाती (मध्यमवर्गाचा वाढता सहभाग)
5.12 लाख कोटी : ‘एफआयआय’ची निव्वळ विक्री
6% : ‘डीआयआय’कडील मालमत्तेची ‘एफआयआय’पेक्षा जास्त असलेली टक्केवारी (इतिहासात प्रथम)
32% : दैनिक उलाढालीच्या तुलनेत किरकोळ बाजारातील वाटा