

टोप : हातकणंगले तालुक्यातील टोप येथील श्री देव कल्लेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आणि पवित्र पुत्रदा एकादशीचे औचित्य साधून बांधण्यात आलेली आकर्षक पूजा टोपसह पंचक्रोशीतील भाविकांचे मुख्य आकर्षण ठरली आहे.
कल्लेश्वर महादेव मंदिरात प्रतिवर्षी श्रावण महिन्यातील सोमवार, महाशिवरात्री आणि वैकुंठ चतुर्दशीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. या काळात मंदिरात आकर्षक स्वरूपाच्या विविध पूजा बांधल्या जातात. यावर्षीच्या श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी नागपंचमीचे औचित्य साधून नागदेवता स्वरूपातील आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. तर दुसऱ्या श्रावण सोमवार व पवित्र पुत्रदा एकादशीच्या पार्श्वभूमीवर 'हरि-हर भक्ती' स्वरूपातील नयनरम्य पूजा साकारण्यात आली आहे.
सध्या या पूजेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे मंदिरास भेट देऊन प्रत्यक्ष पूजा पाहण्यासाठी व शिवदर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. येथील कल्लेश्वर महादेवाचे मंदिर 'करवीर महात्म्य' ग्रंथात उल्लेख असलेले पुरातन, प्रेक्षणीय आणि एक जागृत देवस्थान मानले जाते. विशेष म्हणजे, या मंदिराला नुकताच 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे.