kolhapur | शिवछत्रपती, ताराराणींचा रथोत्सव थाटात

रांगोळ्यांनी सजला मार्ग; शाही लवाजम्यासह उत्साही मिरवणूक
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी यांच्या रथोत्सवाचा थाट पाहण्यासाठी झालेली अलोट गर्दी.
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी यांच्या रथोत्सवाचा थाट पाहण्यासाठी झालेली अलोट गर्दी. (छाया : मिलन मकानदार)
Published on
Updated on

कोल्हापूर : ‘जय शिवाजी, जय भवानी, महाराणी ताराराणींना मानाचा मुजरा’ अशा जयघोषात फुलांच्या वर्षावात, रोषणाईच्या लखलखाटात युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने शुक्रवारी रात्री शाही थाटात पार पडला. जोतिबा चैत्र यात्रेच्या तिसर्‍या दिवशी युगपुरुष छत्रपती शिवराय आणि महाराणी ताराराणींच्या रथोत्सवाची परंपरा यंदाही दिमाखात साजरी करण्यात आली.

ऐतिहासिक भवानी मंडप येथे रात्री आठ वाजता खासदार शाहू महाराज, संभाजीराजे, मालोजीराजे, यशराजराजे आणि मधुरिमाराजे यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. यावेळी महापौर रूपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग उपस्थित होते. रात्री साडेआठ वाजता रथोत्सवाला प्रारंभ झाला.

फुलांनी सजवलेल्या रथात छत्रपती शिवराय आणि महाराणी ताराराणी यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. मिरवणूक मार्गावर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. रांगोळ्यांनी रथमार्ग सजवण्यात आला होता. बालगोपाल तालीम, मिरजकर तिकटीमार्गे महाद्वारासमोर रथ येताच ‘जय भवानी, जय अंबामाता’ असा जयघोष करण्यात आला. गुजरी, भाऊसिंगजी रोडमार्गे भवानी मंडपात आल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून रथोत्सवाची सांगता झाली.

यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, ट्रस्टी अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण, प्रसन्न मोहिते, प्रणील इंगळे, पै. बाबा महाडिक, उदय घोरपडे, संजय पोवार, नगरसेवक आदिल फरास, अमर समर्थ, प्रकाश मोहिते, प्रताप जाधव, अर्जुन माने, सचिन चव्हाण, वसंतराव मुळीक, दिलीप सावंत, किशोर घाटगे, संभाजी साळुंखे, पै. विष्णू जोशीलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पुस्तक वाटप, ऐतिहासिक देखावे, रयतेचे अन्नछत्र...

रथोत्सवाच्या मार्गावर विविध तालीम संस्था-तरुण मंडळे आणि सामाजिक संघटनांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्यसौदामिनी महाराणी ताराबाई या सौ. वसुधा पवारलिखित पुस्तकाच्या 1 हजार प्रतींचे वाटप करण्यात आले. तसेच, मार्गावर शिवछत्रपती, संत तुकाराम महाराज, अंबाबाई देवीसह गड-कोट आणि शिवछत्रपतींच्या इतिहासाची माहिती देणार्‍या सप्तरंगी रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. अनेक संस्थांनी रयतेचे अन्नछत्र उपक्रम राबविला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news