कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहर आणि जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, शिवसेनेने आपली ताकत वेळोवेळी दाखवून दिली आहे. आगामी कोल्हापूर महापालिका निवडणूक त्रीसदस्यीय पद्धतीने होत असून, शिवसेनेला याचा लाभच होणार आहे. कोल्हापूर शहरासाठी गेल्या काही महिन्यांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भरघोस निधी दिला असून, कोल्हापूर शहराचा विकास करण्याकरिता शिवसेना कटिबद्ध आहे. शिवसेना आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार आहे", अशी माहिती शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिली.
शिवसेना आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत दुधवडकर म्हणाले, "आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास शिवसैनिक तयार आहेत. ही निवडणूक स्वबळावर लढावी आणि जिंकून शिवसेनेचा महापौर करावा, यासाठी सर्वजण आग्रही आहेत. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असून, शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर फडकून, शिवसेनेचा महापौर करून दाखवू", असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील शिवसैनिकांचा २७ फेब्रुवारीच्या दरम्यान मेळावा आयोजित केला जाणार आहे, असेही ते म्हणाले.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पाचवेळा हा मतदारसंघ शिवसेनेने जिंकला आहे. या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक शिवसेनेने लढवावी. याबाबत सर्वच लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आग्रही असून, शिवसैनिकांच्याही याच भावना आहेत. याबाबतचा अहवाल लवकरच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करणार आहे. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार निर्णय होईल", असेही दुधवडकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख, खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, शहरप्रमुख शिवाजी जाधव, माजी जिल्हाप्रमुख विनायक साळोखे आदी शिवसेना आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.