Lok Sabha Election 2024 Results : शाहू महाराज, धैर्यशील माने विजयी

Lok Sabha Election 2024 Results : शाहू महाराज, धैर्यशील माने विजयी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून दणदणीत विजय मिळविला. शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक यांचा त्यांनी एक लाख 54 हजार 964 मतांनी पराभव केला; तर हातकणंगले मतदारसंघातून क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणार्‍या लढतीत अखेर शिंदे शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील सरूडकर, स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांना अस्मान दाखविले. माने यांनी सलग दुसर्‍यांदा आपली जागा कायम राखताना सरूडकर यांचा 13 हजार 426 मतांनी पराभव केला.

रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामात सकाळी आठ वाजता कोल्हापूरची तर राजाराम तलाव गोदामात हातकणंगलेची मतमोजणी सुरू झाली. 1998 नंतर कोल्हापुरातून पहिल्यांदाच काँग्रेसचा झेंडा लोकसभेत पोहोचला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या कोल्हापूरच्या जागेवर त्यांना विजय मिळविता आला नाही. मंडलिक हे नॉट रिचेबल असल्याचा सुरुवातीपासून झालेला प्रचार त्यांच्या पूर्णपणे विरोधात गेला; तर महायुतीच्या नेत्यांनी शाहू महाराज दत्तक आल्याच्या काढलेल्या मुद्द्याचे कोल्हापूरकरांनी पंचगंगेत विसर्जन केले आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत झाली. कधी माने यांची आघाडी तर कधी सरूडकर यांची आघाडी अशा परिस्थितीत कोण निवडून येणार याची चुरस शेवटपर्यंत कायम होती. मतमोजणीच्या सात फेर्‍या शिल्लक असताना शिंदे शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी सरूडकर यांच्यावर बारा हजार मतांची निर्णायक आघाडी घेतली. तेथेच माने यांचा विजय निश्चित झाला.

गड आला, पण सिंह गेला : शाहू महाराज

आजचा विजय कोल्हापूरच्या जनतेचा आहे. शिव-शाहू विचारांचा पुरस्कार करणारा हा विजय म्हणावा लागेल. लोकांना जे पाहिजे होते तेच झाले आहे. विजयाचे श्रेय जनतेला तसेच महाविकास आणि इंडिया आघाडीतील सर्व पक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आहे. निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे आमदार पी. एन. पाटील आज आपल्यामध्ये नाहीत. त्याची खंत वाटते. गड आला, पण सिंह गेला, अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार शाहू महाराज यांनी व्यक्त केली.

विरोधक फुटले, माने आले!

2019 च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अस्लम सय्यद यांनी घेतलेल्या 1 लाख 23 हजार मतांनी राजू शेट्टी यांना घरी बसविले. 2024 च्या निवडणुकीत माने यांच्या विरोधकांत फूट पडली. शेट्टी यांना पूर्वी साथ देणारे सत्यजित पाटील-सरूडकर ठाकरे शिवसेनेकडून मैदानात उतरले; तर वंचितने जि.प.चे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांना रिंगणात उतरवले होते. विरोधकांतील या फुटीमुळे माने यांना विजय मिळवून दिला.

विश्वास सार्थ ठरवू : माने

गेल्या पाच वर्षांत मी विकासकामे करत गेलो. विरोधक मात्र टीका करत राहिले. विरोधकांनी फक्त टीकाच केली. पण, काम केले नाही.काम करत गेलो. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघातून मतदारांनी माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत पुन्हा खासदार केले आहे. जनतेचा हा विश्वास मी सार्थ ठरवेन, अशी प्रतिक्रिया धैर्यशील माने यांनी माध्यमांना दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news