

Kagal Unopposed election
कागल : कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली बिनविरोध नगरसेविका निवडून आली आहे. वैदयकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे बंधू अन्वर मुश्रीफ यांच्या सुनबाई सेहरनिदा नवाज मुश्रीफ कागल नगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यांच्या विरोधात असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या व मंडलिक गटाच्या उमेदवार नूर जहान नायकवडी यांनी आश्चर्यकारकरित्या आज (दि.१९) दुपारी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. तसेच आणखी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यामुळे बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, मागील दहा वर्षांपासून टोकाचा राजकीय संघर्ष असणार्या आणि एकमेकांना पाण्यात पाहणारे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व शाहू समूहाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे समरजित घाटगे यांनी मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही सत्तेसाठी एकत्र येत नाही, तर कागलच्या विकासासाठी समान हेतूने एकत्र येत असल्याचे सांगितले. आम्ही एकत्र येऊ, असे यापूर्वी वाटत होते का? त्यामुळे आता भविष्यात काय होईल, याचा विचार करून एकत्र आलेलो नाही, असे एका प्रश्नाला उत्तर देत जिल्हा परिषद निवडणुका देखील आम्ही एकत्र लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपली भूमिका मांडताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, अशा प्रकारची युती कागल तालुक्यात यापूर्वीही झालेल्या आहेत. परंतु, आपण व घाटगे एकत्र येण्याच्या घटना इतक्या अचानक घडल्या की, त्यामुळे कार्यकर्त्यांची मते देखील जाणून घेण्यासाठी वेळ मिळाला नाही. टोकाचा संघर्ष असताना आम्ही एकत्र आलो आहे. त्यामुळे संघर्ष सोडून आता हातात हात घालून काम करण्याची भूमिका घेतली आहे. कार्यकर्त्यांनी देखील यापूर्वी झालेल्या गोष्टी मनातून काढून टाकाव्यात आणि जास्तीत जास्त मताधिक्य मिळविण्यासाठी एकजुटीने कामाला लागावे.