Kagal Satara Highway | कागल-सातारा महामार्गाचे रुंदीकरण पुन्हा ठप्प!

अनेक ठिकाणी वाहनांची अभूतपूर्व कोंडी; अवघ्या दोन तासांचा प्रवास गेलाय पाच तासांवर
Kagal Satara Highway
Kagal Satara Highway | कागल-सातारा महामार्गाचे रुंदीकरण पुन्हा ठप्प!
Published on
Updated on

सुनील कदम

कोल्हापूर : प्रदीर्घ काळापासून रडतखडत सुरू असलेले कागल-सातारा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या महिनाभरापासून जवळपास ठप्पच झाले आहे. परिणामी, या मार्गावर कित्येक ठिकाणी वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी होत असून अवघ्या दोन तासांच्या प्रवासासाठी पाच-सहा तास वेळ लागत आहे.

भाजप-शिवसेना युती शासनाने 2014 मध्ये सातारा-कागल महामार्गाच्या सहापदरीकरणाला मंजुरी दिली. मात्र, मंजुरीनंतर हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करायचा की महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने करायचा, यावरून तिढा निर्माण झाला. त्यानंतर या महामार्गावर टोल कुणी वसूल करायचा, यावरून पुन्हा एकदा महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम रेंगाळत पडले. त्यानंतर 2017 मध्ये या कामाच्या प्रत्यक्ष निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली, मात्र बांधकामाच्या अटी-शर्तीतील बदल, कामाचा प्रत्यक्षातील खर्च यांसारख्या कारणांवरून दोन वर्षांत तब्बल 22 वेळा या कामाच्या निविदेमध्ये फेरबदल करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सूत्रे हातात घेऊन 2022 मध्ये कामाची प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया सुरू केली.

दोन ठेकेदार कंपन्या!

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामाचे सातारा जिल्ह्यातील शेंद्रे ते सांगली जिल्ह्यातील पेठनाका आणि पेठनाका ते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल असे दोन टप्पे केले आहेत. यापैकी पेठ ते शेंद्रे या 67 किलोमीटर अंतराचे आणि 1895 कोटी रुपये खर्चाचे काम एका बांधकाम कंपनीकडे आहे, तर पेठनाका ते कागल या 63 किलोमीटर अंतराचे आणि 1502 कोटी रुपये खर्चाचे काम दुसर्‍या एका कंपनीकडे आहे. साधारणत: सप्टेंबर 2022 मध्ये या महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे. पण दोन्हीही कंपन्यांचे काम इतक्या धिम्या गतीने सुरू आहे की अजून निम्मेसुद्धा काम पूर्ण झालेले नाही. हे काम पूर्ण करण्याची मुदत जानेवारी 2025 मध्ये संपलेली आहे, मात्र सध्याची या कामाची गती विचारात घेता आणखी किमान तीन-चार वर्षे तरी हे काम पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

वाहनांची कोंडीच कोंडी!

या महामार्गावरून दररोज किमान 90 हजार ते 1 लाख छोट्या मोठ्या वाहनांची ये-जा चालते, पण जुना महामार्ग अनेक ठिकाणी कामासाठी म्हणून बंद करण्यात आल्याने या हजारो वाहनधारकांना धोकादायक सेवारस्त्यांशिवाय पर्याय राहिलेला दिसत नाही. परिणामी, या मार्गावर आजकाल कित्येक ठिकाणी वाहतूक कोंडी आणि अपघात हे नित्यनेमाचे होऊन बसले आहेत.

कामच झालंय ठप्प!

मागील एक-दोन महिन्यांपासून या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम जवळपास ठप्प आहे. कागल आणि कोल्हापूर येथील कामांच्या स्वरूपात काहीसा बदल झाल्यामुळे हे काम रेंगाळले. मात्र, अन्य कामांच्या बाबतीतही सावळागोंधळच आहे. जवळपास सगळी कामे वेगवेगळ्या कारणांनी ठप्प झालेली आहेत.

वाहनधारकांमधून उद्रेक होण्याची चिन्हे!

या महामार्गाच्या ठेकेदार कंपन्यांनी वाहनधारकांना उपलब्ध करून दिलेले रस्ते भयावह स्वरूपाचे आहेत. या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य माजलेले दिसत आहे. अनेकवेळा वाहने या खड्ड्यात अडकून वाहतुकीचा बट्ट्याबोळ होताना दिसत आहे. खड्ड्यांमध्ये आदळून-आपटून वाहनधारकांचे रोज लाखो रुपयांचे नुकसान होताना दिसत आहे. मात्र शासन, प्रशासन आणि ठेकेदार कंपन्यांना वाहनधारकांच्या या कसरतीशी जणू काहीच देणेघेणे असलेले दिसत नाही. त्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांतील वाहनधारक आणि प्रवासी आता या कामाबद्दल उठाव करण्याची चिन्हे दिसू लागलेली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news