

कागल/कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सौंदत्ती येथे रेणुका यात्रेसाठी निघालेल्या विलास महादेव चव्हाण (वय 68 रा. रुईकर कॉलनी) यांचा अपघाती मृत्यू झाला. शनिवारी रात्री लक्ष्मी टेकडी येथे लक्ष्मी मंदिरात नारळ फोडून रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, रविवारी सकाळी चव्हाण यांचा चुलत पुतण्या मनोज रामचंद्र चव्हाण (वय 53) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने चव्हाण कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
विलास चव्हाण हे त्यांची पत्नी भागातील रहिवाशांसोबत मोटारीतून उजळवाडी सौंदती यात्रेसाठी जात होते. कागल येथील लक्ष्मीदेवीला नारळ फोडण्यासाठी उतरले. नारळ फोडून रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. गंभीर अवस्थेत त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये आणण्यात आले.
मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, त्यांच्या चुलत पुतण्या मनोज चव्हाण यांचाही रविवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. मनोज यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. ते महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरीस होते.