

पेठवडगाव (पुढारी वृत्तसेवा)
पेठ वडगावच्या नगरपरिषद निवडणुकीनंतर स्ट्राँग रूमसमोरील खाजगी सीसीटीव्ही काढून टाकण्याच्या प्रशासनाच्या कारवाईवर आज विधीमंडळात प्रश्न उपस्थित होताच वातावरण तापले. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे आमदार सतेज पाटील यांनी हा मुद्दा अत्यंत गंभीर असल्याचे सांगत प्रशासन आणि पोलिस विभागाच्या भूमिकेवर थेट सवाल उभे केले.
पेठ वडगाव येथे २ डिसेंबर रोजी नगरपरिषदेचे मतदान झाले. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम यंत्रे मराठा समाज सांस्कृतिक भवनात ठेवण्यात आली असून तेच स्ट्राँग रूम म्हणून वापरले जात आहे. याठिकाणी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत होते. मात्र प्रशासन आणि पोलिस विभागाने हे कॅमेरे काढून टाकले असल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी सभागृहात केला.
फक्त एवढेच नव्हे, तर स्ट्राँग रूमच्या अगदी समोर असलेल्या ‘मोरे’ यांच्या घरावर बसवलेले खाजगी सीसीटीव्ही कॅमेरेही मुख्याधिकारी व पोलिस बंदोबस्ताच्या उपस्थितीत तोडण्यात आले.
“स्वतःच्या सुरक्षेसाठी लावलेल्या कॅमेर्यांवर प्रशासनाचा असा हस्तक्षेप कसा होऊ शकतो? असा अधिकार कोणी दिला? यातून ईव्हीएम प्रक्रियेवर संशय घेण्याला मोठ्या प्रमाणात वाव मिळतो,” अशी टीका आमदार पाटील यांनी केली.
प्रशासनाची ही बेबंदशाही असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि काढलेले सर्व कॅमेरे तातडीने पुन्हा बसवण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.
या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन सभागृहात दिले.