कोल्हापूर : गोकुळच्या प्रचारात व्यस्त असातानाही वेळात वेळ काढून आ. सतेज पाटील जिल्हा बँकेच्या सभेला आले, अशी खोचक टिप्पणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी करताच आ. सतेज पाटील यांनीही व्यासपीठावर बसलेले ए. वाय. पाटील यांच्याकडे हात करत राष्ट्रवादीत ए. वाय. पुन्हा आल्याने के. पीं.ना कसं वाटतंय हे पाहायला आलो असल्याचा मिश्कील टोला लगावला.
जिल्हा मध्यवर्ती बँकेची ८८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी महासैनिक दरबार हॉल येथे झाली. व्यासपीठावर बँकेचे सर्वपक्षीय संचालक उपस्थित होते. सभेला सुरुवात होण्यापुर्वी सकाळी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांनी गोकुळ निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिला.
पाठिंब्यानंतर जिल्हा बँकेच्या सभेसाठी आ. सतेज पाटील आणि ए. वाय. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. यानंतर माजी आ. के. पी. पाटील तिथे आले. व्यासपीठावर येताच के. पी. यांनी आ. सतेज पाटील यांना नमस्कार केला. यावर आ. पाटील यांनी, ए. वाय. यांच्याकडे हात करत, आता मला नको, त्यांना नमस्कार करा, असे सांगितले. यावर के.पी. स्मितहास्य करत खुर्चीत बसले. मंत्री मुश्रीफ यांनी प्रास्तविकात बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रास्ताविक झाल्यानंतर त्यांनी, गोकुळच्या प्रचारात व्यस्त असतानाही ते बँकेच्या सभेला आले, असे वक्तव्य करत आ. सतेज पाटील यांना डिवचले. यावर आ. पाटील यांनीही तत्परतेने ए. वाय. राष्ट्रवादीत आल्यामुळे के.पीं.ना कसं वाटतंंय हे पाहायला आलो असल्याचे प्रत्युत्तर दिल्यानंतर एकच हशा पिकला.
हल्ली त्यांच्यावर जनसुराज्यचा प्रभाव
सभा संपल्यानंतर गटसचिवांनी व्यासपीठावरच मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार केला. सत्कारप्रसंगी त्यांनी गुलाबी शाल मंत्री मुश्रीफ यांना दिली. यावर आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी गुलाबी शाल आणण्याचे कारण काय, असे विचारले. यावर आ. सतेज पाटील यांनी, मंत्री मुश्रीफ यांच्यावर हल्ली जनसुराज्यचा प्रभाव आहे, त्यामुळे गुलाबी शाल आणली असावी, असे म्हणताच उपस्थितांनी त्यांच्या मिश्कील टिप्पणीला हसून दाद दिली.