थेट पाईपलाईन ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार; सतेज पाटील यांची ग्वाही

थेट पाईपलाईन ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार; सतेज पाटील यांची ग्वाही
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनने पाणी आणण्याची योजना पूर्णत्वाच्या दिशेने जात असून, ऑगस्ट 2023 ला या योजनेचे काम पूर्ण होऊन चाचणी घेतली जाईल, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. रविवारी सतेज पाटील यांनी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्यासह महापालिकेच्या माजी पदाधिकारी, अधिकार्‍यांसोबत योजनेची पाहणी केली. पहिल्यांदाच धरणातील पाणी जॅकवेलमध्ये आल्यामुळे या पाण्याचे पूजन करण्यात आले.

शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनने पाणी आणण्याची कोल्हापूरकरांची गेल्या 40 वर्षांपासूनची मागणी होती. 2010 च्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान आमदार सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईन योजना मंजूर केली नाही, तर आमदारकी लढणार नाही, अशी घोषणा पापाची तिकटी येथील सभेमध्ये केली होती. त्यानंतर त्यांनी या योजनेचा पाठपुरावा केला. डिसेंबर 2013 मध्ये तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने या योजनेसाठी 485 कोटी रुपये मंजूर करून तत्काळ निधी राज्य सरकारमार्फत महापालिकेला वर्ग केला होता. ऑगस्ट 2014 मध्ये या योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. विविध अडथळ्यांवर मात करत योजनेचे काम पूर्णत्वाच्या दिशेने सुरू आहे.

जॅकवेलमध्ये दोनच दिवसांपूर्वी पहिल्यांदा धरणातील पाणी आले. त्यामुळे रविवारी सतेज पाटील यांनी अधिकारी, पदाधिकार्‍यांसह पुन्हा या योजनेची पाहणी केली. तसेच जॅकवेलमध्ये जाणार्‍या पाण्याचे पूजन त्यांनी यावेळी केले. यावेळी शारंगधर देशमुख, राजेश लाटकर, मधुकर रामाणे, संदीप कवाळे, सचिन पाटील, अशपाक आजरेकर, 'गोकुळ' संचालक राजू मोरे, जे. के. पाटील, राजू साबळे, संदीप नेजदार, दिग्विजय मगदूम आदी उपस्थित होते.

उर्वरित कामे गतीने पूर्ण करा

उर्वरित कामे महिनाभरात पूर्ण करा आणि ऑगस्ट महिन्यापासून चाचणीला सुरुवात करा, अशा सूचनाही सतेज पाटील यांनी महापालिकेचे जलअभियंता नेत्रदीप सरनोबत आणि जीकेसी कंपनीचे राजेंद्र माळी यांना दिल्या. या योजनेतून कोल्हापूरपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी जॅकवेलमध्ये 940 एचपीचे 4 पंप बसविण्यात आले आहेत. यापैकी 3 पंप सुरू करण्यात येतील. एक पंप स्टॅडबाय म्हणून ठेवण्यात येणार आहे. वीज कनेक्शनचे कामही अंतिम टप्प्यात आहे.

पुण्याईचे काम करण्याचे भाग्य

धरणातून थेट पाईपलाईनने पाणी आणण्याचे पुण्याईचे काम करण्याचे भाग्य मला मिळाले. आजच्या दिवशी पहिल्यांदा या जॅकवेलमध्ये पाणी आले. त्यामुळे हा दिवस माझ्या द़ृष्टीने आनंदाचा असल्याचे सांगताना सतेज पाटील यांना अश्रू आवरता आले नाहीत. सर्वांच्याच सहकार्यातून हे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सर्वांचेच आभार मी मानतो, असेही यावेळी सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news