

कोल्हापूर : निवडून येऊ शकत नसल्याने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील विरोधी उमेदवाराच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पराभवाची खात्री झाल्यामुळेच त्यांनी आता फोडाफोडी सुरू केली आहे, असा हल्लाबोल करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी आमदार जयश्री जाधव यांच्या पक्षातंराने काँग्रेसवर कोणताही परिणाम नाही, असे गुरुवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
फोडाफोडी करण्यात माहीर असलेल्या शिंदे गटाने अगोदर सुरत मार्गे गुवाहाटी असा प्रवास केला होता. आता तसा कोल्हापूर-मुंबई प्रवास घडला आहे. कोल्हापूरच्या जनतेने काँग्रेसच्या उमेदवार म्हणून त्यांना मतदान केले आणि एका रात्रीत त्या निघून गेल्या. त्या ज्यांच्याकडे गेल्या आहेत त्यांना निवडून येण्याची खात्री नाही; परंतु कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे, शंभर टक्के ही जनता काँग्रेसच्या बाजूने राहील, असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, उमेदवार निवडीच्या प्रक्रियेमध्ये आ. जाधव यांच्याशी चर्चा केली आहे. चारवेळा भेटलो. उमेदवारी देता येणार नसल्याची त्यांना कल्पना दिली होती. त्यांनी ती मान्य देखील केली होती. अचानक काय परिवर्तन झाले माहीत नाही. चार्टर्ड फ्लाईटने त्यांना मुंबईत नेले गेले व प्रवेश करवून घेतला. नेमके काय घडले किंवा दबाव आला का, याबाबत त्याच सांगू शकतील. त्याचे उत्तर कोल्हापूरच्या जनतेला देणे अपेक्षित आहे. विरोधी उमेदवाराबाबत प्रचंड नाराजी आहे. शंभर कोटींचे रस्ते आणले म्हणून गवगवा केला; परंतु सहा-सहा महिने झाले तरी वर्कऑर्डर दिल्या जात नाहीत. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी देखील विचारणा केली होती. मुख्यमंत्र्यांचा दबाव त्यांच्यावर होता. बोगस कामे केली आहेत. जनता मतदान करणार नाही, हे माहीत असल्यामुळे हे फोडाफोडीचे राजकारण विरोधी उमेदवाराने केले आहे; परंतु कोल्हापूरची जनता हे सहन करणार नाही, असेही आ. पाटील म्हणाले.
त्यांच्यावर दबाव आणला का, व्यवसायासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून काही झाले का, अशी चर्चा आहे. त्याचा खुलासा जाधव यांनी करणे अभिप्रेत आहे. जयश्री जाधव यांच्यासाठी आमच्या पाच ते दहा कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले होते. त्यांना जाधव काय उत्तर देणार? जाण्यापूर्वी त्यांनी आपल्याशी कोणतीही चर्चा केली नाही, याबद्दल खंत व्यक्त करून आ. जाधव यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी पाहिल्यास त्यांचे हे कृत्य योग्य नसल्याचे आ. पाटील म्हणाले. आम्ही फोडाफोडी करणार नाही; परंतु आहे त्या ठिकाणी राहून काही कार्यकर्ते आमचे काम करून त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतील, असेही आ. पाटील म्हणाले.