

कोल्हापूर : महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला हे निश्चित झाल्यानंतर उमेदवार जाहीर होतील. त्यामुळे कोल्हापूरचे ‘उत्तर’ देखील तुम्हाला दोन दिवसांत मिळेल, असे सांगून आ. सतेज पाटील यांनी कोणी कशातही आघाडी घेतली, तरी विजयी षटकार महाविकास आघाडीच मारणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जागा वाटपाची प्रक्रिया असते. त्यासाठी सातत्याने बैठका सुरू आहेत. जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामध्ये कोणताही वाद नाही असे सांगून आ. पाटील म्हणाले, महाराष्ट्राला महाविकास आघाडीच शाश्वत सरकार देऊ शकते. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांचे काही गैरसमज झाले आहेत. जागेबाबत थोडे इकडे, तिकडे होत असते. सर्वांना सोबत घेऊन जाणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे गैरसमज असतील ते लवकर संपतील. महाविकास आघाडीवर लोकांचा विश्वास आहे. विजयाच्या बाजूने आपले मत असले पाहिजे, असे सामान्यांना वाटते. त्यामुळे कोणाला तरी पाडण्याची भूमिका महाराष्ट्रातील जनता घेणार नाही.
कोल्हापूर उत्तरमध्ये लोकांचा, जनतेचा पॅटर्न असेल. आमच्यात कोणताही वाद नाही. महायुतीच्या उमेदवारावर आमचे काही अवलंबून नाही. उमेदवार निवडीची आमची एक प्रक्रिया आहे. त्यामुळे लवकरच उमेदवार जाहीर होतील. सांगलीत वाद खासदार विशाल पाटील व आमदार विश्वजित कदम निश्चित मिटवतील, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
कोल्हापूर उत्तरच्या जागेबाबत खासदार शाहू महाराज यांच्या उपस्थितीत सकाळी न्यू पॅलेसवर बैठक झाली. या बैठकीत सर्व इच्छुकांनी मते व्यक्त केली. यावेळी आपण त्यांना उमेदवार आपल्यातीलच असणार आहे, असे सांगितले, तेव्हा त्यांनी कोणालाही उमेदवारी मिळाली, तरी एकत्र काम करण्याची ग्वाही दिली असल्याचे आ. पाटील म्हणाले.