

कोल्हापूर : गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी कोरमचा पोटनियम लागू असल्याचे सरकारचे म्हणणे असेल, तर १३ संचालकांचा कोरम मान्य करा; अन्यथा वाढीव संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी कायदा करण्याऐवजी कोरमचा नियम रद्द करण्याचा कायदा का केला नाही, असा थेट सवाल आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समाज माध्यमावरून त्यांची भूमिका जाहीर करताना केला. तसेच गोकुळच्या निवडणुकीत समविचारीच्या १३ उमेदवारांना मतदारांनी बहुमत दिले. त्यामुळे महायुतीच्या १२ संचालकांनी १० नोव्हेंबरच्या सभेला उपस्थित राहून शशिकांत पाटील यांचा अध्यक्ष होण्याचा मार्ग सुकर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन गोकुळप्रश्नी भूमिका मांडली. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता त्यांच्याच पक्षाच्या राज्यसभा खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन विपरीत भूमिका मांडली. मात्र, त्याला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. कारण गोकुळच्या निवडणुकीत घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही दोन लाख ७० हजार मतांच्या फरकाने कोल्हापूरकरांनी उत्तर दिले होते, असा टोला पाटील यांनी लगावला. अध्यक्ष निवडीसाठी कोरमची आवश्यकता नाही, अशी आमची भूमिका असून न्यायालयातही ती मांडली आहे. मात्र, सरकारच्या म्हणण्यानुसार कोरमचा पोटनियम लागू असेल, तर १३ संचालकांचा कोरम होतो आणि तो पूर्ण आहे. मग हा नियम मान्य नसेल, तर वाढीव संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी कायदा करण्याऐवजी कोरमचा नियम रद्द करण्याचा कायदा सरकारने का केला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.