

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा नियोजन समितीमधून निधी वितरीत करताना विरोधी आमदारांवर अन्याय करण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही मतदारसंघात कामे करयाची की नाही, असा सवाल जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांना केला. यावर पालकमंत्री केसरकर यांनी निधी वितरणात आमदारांवर अन्याय होणार नाही. त्यांचा सन्मान राखला जाईल. मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी दिला जाईल, असे आश्वासन दिले.
शासन आपल्या दारी कार्यक्रमासंदर्भात पालकमंत्री केसरकर यांनी विरोधी आमदारांची बैठक शनिवारी शासकीय विश्रामधाम येथे ठेवली होती. यावेळी त्यांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले, राज्यात सत्तांतर झाल्यापासून जिल्हा नियोजन समितीमधून विरोधी आमदारांवर निधी वितरणात सतत अन्याय झाला आहे. महाविकास आघाडीची सत्ता असताना आम्ही विरोधी आमदारांचाही सन्मान राखत होतो. त्यांनी सुचविलेल्या कामांना आम्ही निधी दिला होता. आता निधी मिळत नसल्यामुळे मतदारसंघातील कामे करण्यात अडचणी येत असल्याचेही पाटील म्हणाले. यावेळी आ. ऋतुराज पाटील, आ. राजुबाबा आवळे, आ. जयश्री जाधव आदी उपस्थित होते.