

गारगोटी : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेस उमेदवार मधुरिमाराजे यांच्या धक्कादायक माघारीनंतर आणि त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील व खासदार छत्रपती शाहू महाराज गारगोटीत एकाच व्यासपीठावर दिसून आले. निमित्त होते युवक नेते राहुल देसाई यांच्या काँग्रेसच्या जाहीर प्रवेशाचे.
कोल्हापूरातील आजच्या नाट्यमय घडामोडीनंतर आमदार सतेज पाटील व खासदार छत्रपती शाहू महाराज प्रथमच गारगोटीतील क्रांतिसिंह व्यासपीठावर लगेच एकत्र आले होते. व्यासपीठावर प्रथम खासदार शाहू महाराज यांचे आगमन झाले. त्यानंतर आमदार सतेज पाटील यांचे आगमन झाले. खासदार छत्रपती शाहू महाराज सतेज पाटील यांच्या आगमनाकडे टक लावून पाहत होते. उभे राहून पाहत होते. व्यासपीठावर आ. सतेज पाटील आल्यानंतर त्यांनी हस्तांदोलन केले. त्यानंतर ते काही काळ एकमेकांशी हितगुज करत होते. कोल्हापुरातील घडामोडींचा लवलेशही दिसून येत नव्हता. त्यामुळे उपस्थितांत दोघांमध्ये सर्व काही आलबेल असल्याची चर्चा सुरू होती.