Sanjay Thorwat | संजय थोरवत यांची ‘ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्स’च्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

 Sanjay Thorwat |
Sanjay Thorwat | संजय थोरवत यांची ‘ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्स’च्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : मुद्रण क्षेत्रातील देशातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठित संस्था असलेल्या ‘ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्स’ (AIFMP) च्या उपाध्यक्षपदी कोल्हापूर येथील प्रथितयश उद्योजक व ‘शिवम ऑफसेट’चे संस्थापक-संचालक संजय थोरवत यांची नुकतीच हैदराबाद येथे झालेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवड झाली. राष्ट्रीय स्तरावरील या महत्त्वपूर्ण पदावर कोल्हापूरच्या उद्योजकाची निवड झाल्याने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. थोरवत हे कोल्हापूर जिल्हा मुद्रक संघाचे अध्यक्ष, कोल्हापूर उद्यम सोसायटीचे उपाध्यक्ष व ‘आसमा’चे उपाध्यक्ष आहेत.

१९५३ मध्ये स्थापन झालेली ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्स ही भारतातील मुद्रण उद्योगातील प्रमुख राष्ट्रीय संघटना असून देशातील सुमारे २.५ लाख मुद्रण व्यवसायांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था म्हणून तिची ओळख आहे. जागतिक स्तरावरही AIFMP ही मुद्रकांची सर्वात मोठी संघटना मानली जाते. या सर्वसाधारण सभेत तुषार धोटे यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. संजय थोरवत यांच्या उपाध्यक्षपदावरील निवडीमुळे भारतीय मुद्रण क्षेत्रातील बदलत्या प्रवाहात कोल्हापूरचा आवाज राष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे पोहोचणार आहे. संजय थोरवत यांचा मुद्रण व्यवसायातील प्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. शालेय शिक्षणानंतर त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी १९८७ मध्ये मुंबईहून १३x१९ आकाराची ट्रेडल मशिन आणून आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर वह्या तयार करणे व बाईंडिंगच्या व्यवसायातून त्यांनी आपल्या कामाचा विस्तार सुरू केला.

ट्रेडल मशिन ते राष्ट्रीय स्तरावरील विस्तार

व्यवसायातील अनुभव, बाजारपेठेची जाण आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर पुढे त्यांनी आधुनिक मुद्रण तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यास सुरुवात केली. पत्नी विजयश्री थोरवत यांची साथ आणि भाऊ विजय थोरवत यांचे सहकार्य यांच्या जोरावर त्यांनी हा निर्णय यशस्वी करून दाखविला.

कमर्शियल प्रिंटिंगपासून पुस्तक निर्मितीपर्यंत विस्तार

२००५ नंतर शिवम ऑफसेटच्या व्यवसायाने सातत्याने मोठी झेप घेतली. आधुनिक वेब ऑफसेट तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शालेय पुस्तकांच्या मुद्रण क्षेत्रात प्रवेश करण्यात आला. कालांतराने विविध क्षमतेच्या वेब ऑफसेट मशिन, शीटफेड प्रिंटिंग मशिन तसेच अत्याधुनिक बाईंडिंग यंत्रणा व्यवसायात समाविष्ट करण्यात आल्या. आज शिवम ऑफसेटमध्ये विविध प्रकारच्या चार रंगांच्या वेब ऑफसेट मशिन, शीटफेड प्रिंटिंग मशिन तसेच क्लॅम्प आणि इनलाईन बाईंडिंगसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध आहे. पुस्तकांचे मुद्रण आणि बाईंडिंग करण्याची क्षमता दररोज सुमारे तीन लाख पुस्तकांपर्यंत पोहोचली आहे. एका छोट्या ट्रेडल मशिनपासून सुरू झालेला हा प्रवास आज आधुनिक तंत्रज्ञान, मोठी उत्पादन क्षमता आणि विविध राज्यांमध्ये विस्तारलेल्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचला आहे.

अडचणींवर मात करत उभी राहिली उद्योगाची भक्कम पायाभरणी

थोरवत यांच्या व्यावसायिक प्रवासात अडचणींची कमतरता नव्हती. एका महत्त्वाच्या मशिनच्या खरेदीसाठी ते स्वतः चेन्नईला गेले. मशिन पसंत पडल्यानंतर तत्काळ व्यवहार करून ती कोल्हापूरला आणण्यात आली; मात्र तांत्रिक अडचणींमुळे तब्बल चार महिने मशिन सुरू होऊ शकली नाही. त्या काळात त्यांनी प्रेस सोडला नाही. अगदी रात्री प्रेसमध्येच कागदांच्या बंडलवर झोपून व्यवसाय उभा ठेवण्याचा प्रयत्न केल्याची आठवण त्यांच्या संघर्षाची साक्ष देते. व्यवसाय वाढत असताना कामगारांना वेळेवर वेतन, ग्राहकांना वेळेवर काम आणि पुरवठादारांची देणी यांना प्राधान्य देण्याचे धोरण त्यांनी जपले. कोव्हिडच्या कठीण काळात काम नसतानाही कामगारांना वेतन देऊन त्यांच्या अडचणींमध्ये साथ दिली. त्यामुळे उद्योगाच्या वाढीसोबतच कामगारांशी निर्माण झालेले विश्वासाचे नाते ही त्यांच्या व्यवसायाची महत्त्वाची ताकद ठरली.

कोल्हापुरातून राष्ट्रीय स्तरावर विस्तार

आज शिवम ऑफसेटची कोल्हापुरात दोन, पुणे येथे एक आणि बेळगाव येथे एक अशी एकूण चार युनिट्स कार्यरत आहेत. या युनिट्समधून ४०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. पुणे आणि बेळगाव येथील युनिट्समध्ये प्रकाशनाशी संबंधित कामे, तर कोल्हापुरातील युनिट्समध्ये विविध प्रकारची कमर्शियल प्रिंटिंगची कामे केली जातात. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि बिहार या राज्यांमध्येही त्यांच्या व्यवसायाचा विस्तार झाला आहे. स्थानिक पातळीवर सुरू झालेला व्यवसाय आज विविध राज्यांतील ग्राहकांपर्यंत पोहोचला आहे. यापूर्वी भारतामधील १०० प्रेसच्या क्रमवारीत शिवम ऑफसेटला दहावा क्रमांक मिळाला आहे. एका छोट्या शहरातून उभ्या राहिलेल्या उद्योगाने राष्ट्रीय स्तरावर मिळविलेली ही दखल त्यांच्या व्यावसायिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरला.

कुटुंब, कर्मचारी आणि मूल्यांवर उभारलेले साम्राज्य

या संपूर्ण वाटचालीत पत्नी विजयश्री थोरवत, भाऊ विजय थोरवत तसेच मुले कमलेश आणि शिवम यांचे सहकार्य त्यांना लाभले. आज व्यवसायाची यंत्रणा इतकी सक्षम झाली आहे की संजय थोरवत काही काळ बाहेर असतानाही त्यांच्या मुलांनी आणि भावांनी जबाबदारी समर्थपणे सांभाळली ‘व्यवसायात केवळ पैसा कमावणे महत्त्वाचे नाही; त्याबरोबर सामाजिक बांधिलकी जपणे आणि समाजासाठी योगदान देणेही तितकेच महत्त्वाचे आहे,’ अशी त्यांची भूमिका आहे. सामाजिक कार्यातही यथाशक्ती योगदान देत त्यांनी व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकीची जाणीव जपली आहे. आपल्या यशामागील प्रेरणेबद्दल बोलताना ते आपले वडील महादेव थोरवत यांच्याकडून मिळालेल्या शिकवणीला आणि आत्मविश्वासाला विशेष श्रेय देतात. आव्हानांकडे संकट म्हणून न पाहता सुवर्णसंधी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन त्यांच्या उद्योजकीय प्रवासातून प्रकर्षाने जाणवतो.

मुद्रण उद्योगाच्या बदलत्या वाटचालीला नवी दिशा

आपल्या निवडीनंतर बोलताना संजय थोरवत म्हणाले, ‘भारतीय मुद्रण उद्योगाच्या सीमा वेगाने बदलत आहेत. आज अनेक मुद्रक पारंपरिक मुद्रणासोबतच डिजिटल प्रिंटिंग, पॅकेजिंग आणि त्यासंबंधित विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. मुद्रण क्षेत्राचा विस्तार आता केवळ पारंपरिक प्रिंटिंगपुरता मर्यादित न राहता व्यापक ‘प्रिंट अँड पॅकेजिंग इकोसिस्टम'कडे होत आहे. या बदलत्या संधींचा स्वीकार करून उद्योगाला नव्या दिशेने घेऊन जाणे ही काळाची गरज आहे.’ स्थानिक पातळीवर एका छोट्या ट्रेडल मशिनपासून सुरुवात करून आधुनिक मुद्रण तंत्रज्ञान, मोठी उत्पादन क्षमता, चार युनिट्स, शेकडो रोजगार आणि देशभरातील ग्राहकवर्ग उभारण्यापर्यंतचा संजय थोरवत यांचा प्रवास हा कोल्हापूरच्या उद्योजकीय जिद्दीचे आणि कर्तृत्वाचे प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे. आता AIFMP च्या उपाध्यक्षपदाची राष्ट्रीय जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली असून, भारतीय मुद्रण उद्योगाच्या बदलत्या स्वरूपाला समजून घेत नव्या संधी, तंत्रज्ञान आणि प्रिंट-पॅकेजिंगच्या विस्तारणाऱ्या क्षेत्राला चालना देण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग होणार आहे. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर्सच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल संजय थोरवत यांचे मुद्रण, उद्योग, व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news