

कोल्हापूर : कोल्हापूरची जनता स्वाभिमानी व सुज्ञ असून स्वार्थाने पछाडलेल्या गद्दार प्रवृत्तीला धडा शिकवेल, असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी व्यक्त केला. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील महाविकास आघाडी व घटक पक्ष पुरस्कृत उमेदवार राजेश भरत लाटकर यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
गद्दारांना गाडण्यासाठी सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते जीवाचे रान करतील व त्यात शिवसैनिक सर्वात पुढे असतील, असे ते म्हणाले. यंदाची विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून खोके सरकार उद्ध्वस्त करण्यासाठी जनता आतुर आहे. लोकशाहीचे धिंडवडे उडवणार्या गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे. कोल्हापूरची जनता सुज्ञ असून कोणत्याही आमिषांना बळी न पडता सर्वसामान्य कार्यकर्ते असलेले राजेश लाटकर यांना बहुमताने विजयी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर उत्तरच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न घेऊन राजेश लाटकर हे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून जनतेकडे कौल मागत आहेत. मतदारसंघातील सर्व भागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार मोहीम राबवण्याचे नियोजन शिवसैनिकांनी केले असून लाटकर मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन इतिहास घडवतील असे ते म्हणाले. यावेळी उपस्थित पदाधिकार्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व लाटकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.