सांगली : मिरज, कोल्हापूर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’पासून वंचित

सांगली : मिरज, कोल्हापूर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’पासून वंचित

सांगली; स्वप्नील पाटील :  मध्य रेल्वेचे मिरज आणि कोल्हापूरकडे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. देशभरात अनेक प्रमुख रेल्वे मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येत असताना मिरजमार्गे एकही वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आलेली नाही. तसेच कोल्हापूर-पुणे आणि बेळगाव-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करण्याची प्रवाशांची मागणी असतानादेखील याकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत आहे.

मिरज हे मध्य रेल्वेच्या पुणे आणि सोलापूर, तर दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाला जोडणारे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. या जंक्शनमधून कोल्हापूर, पुणे, बेळगाव आणि सोलापूर या चार रेल्वे मार्गांवर गाड्या धावतात. परंतु, गेल्या अनेक वर्षांत या मार्गावरून एकही नवीन रेल्वे सुरू करण्यात आलेली नाही किंवा पुण्यातील रेल्वे गाड्यांचा मिरज, कोल्हापूरपर्यंत विस्तार केलेला नाही.

कोल्हापूर, मिरज रेल्वे स्थानकातून मध्य रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतानादेखील या स्थानकांकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत आहे. पुणे-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या मार्गावर मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करावी, अशी प्रवासी आणि प्रवासी संघटनांतून मागणी होत आहे. ही गाडी सुरू केल्यास मिरज, कोल्हापूर मुंबईशी जलद जोडले जाणार आहे. परंतु, देशभरात वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केल्या जात असताना पश्चिम महाराष्ट्राला मात्र रेल्वेने वंदे भारत एक्स्प्रेसपासून वंचित ठेवले आहे. दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने ही एक्स्प्रेस सुरू करणे शक्य आहे.
पुणे, मुंबईकडे रात्रीचा प्रवास करण्यासाठी कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी, हुबळी-दादर एक्स्प्रेस या दोनच गाड्या आहेत. त्यामुळे मुंबईला जाणार्‍या प्रवाशांची या गाडीला गर्दी असते. रेल्वेकडून कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस बंद करण्यात आल्याने पुण्यापर्यंतचा प्रवास करणार्‍या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. पुण्यापर्यंतचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना महालक्ष्मी, एलटीटी आणि निजामुद्दीननेच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या गाड्यांवर अतिरिक्त ताण आहे.

कोल्हापूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू केल्यास महालक्ष्मी एक्स्प्रेसवरील आणि बेळगाव-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू केल्यास हुबळी-दादर एक्स्प्रेसवरील निम्मा ताण कमी होणार आहे. इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू केल्यास प्रवासी संख्येत वाढ होणार असल्याने रेल्वेच्या उत्पन्नातदेखील वाढ होणार आहे. त्यामुळे रेल्वेकडून मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेससह कोल्हापूर-पुणे, बेळगाव-पुणे इंटरसिटीची सुरू करावी, अशी मागणी प्रवासी आणि प्रवासी संघटनांतून जोर धरू लागली आहे.

पुण्यातील एक्स्प्रेसचा विस्तार कधी होणार?

पुणे-जम्मूतावी, पुणे-हावडा आणि पुणे-पाटणा या तीन गाड्यांचा मिरजपर्यंत विस्तार करण्यास रेल्वेला सहज शक्य आहे. परंतु, रेल्वेच्या उदासीनतेमुळे या गाड्या पुणे स्थानकातच थांबून राहतात. या गाड्यांचा मिरजपर्यंत विस्तार करणे गरजेचे आहे. तसेच या गाड्या मिरजपर्यंत आल्याने पुणे रेल्वेस्थानकातील फलाट रिकामे राहतील व तेथून नव्या गाड्या सुरू करता येणे रेल्वेला शक्य होणार आहे. त्यामुळे जम्मूतावी, हावडा, पाटणा या तीन गाड्यांचा मिरजपर्यंत विस्तार करणे गरजचेे आहे. विस्तार झाल्यास या भागातील भारतीय सैन्यात असणार्‍या जवानांसाठीदेखील उपयुक्त ठरणार आहे.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांतून वंदे भारत एक्स्प्रेस आणि इंटरसिटी एक्स्प्रेसची वारंवार मागणी होत आहे. दुहेरीकरणासह विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर अनेक रेल्वेगाड्या नव्याने सुरू होणार आहेत. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेससह इंटरसिटी गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांची लवकरच भेट घेणार आहे.
– मकरंद देशपांडे,
भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री तथा अध्यक्ष, रेल्वे कृती समिती मिरज

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news