

Sangli Chandoli Dam Water Level
सरूड : चांदोली (वारणा) धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. यंदाच्या तांत्रिक वर्षातील ३४ दिवसांत १ हजार २०० मिलिमिटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. साहजिकच धरणातील पाणीसाठा झपाट्याने १२ टीएमसीने वाढून गुरुवारी ( दि. ३) सकाळी २६.१३ टीएमसी (७५.९७ टक्के) वर पोहोचला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर धरण प्रशासन सजग झाले आहे. पाणी सांडवा पातळी ओलांडण्याच्या स्थितीत असून पुढील २४ तासांत कोणत्याही क्षणी धरणातून वक्राकार दरवाजामधून पाणी विसर्ग होणार आहे. यासाठी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, चांदोली धरणाची पाणी साठवण क्षमता ३४.४० टीएमसी इतकी असून धरणात निर्धारित पाणीसाठा झाल्यानंतरच स्वयंचलित अर्ध वक्राकार दरवाजे उघडून वारणा नदीत पाण्याचा विसर्ग कमीअधिक होत असतो. तथापि, सद्या धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्रातून १ हजार ६४० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरु आहे. गुरुवारी (ता.३) सकाळ पर्यंतच्या २४ तासांत ३९ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. त्याचवेळी धरणात पाणलोट क्षेत्रातून काही दिवस ६ ते ७ हजार क्यूसेकने होणारी पाण्याची आवक सद्या ११ हजार १५७ क्यूसेक वेगाने होत आहे.
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सद्या अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. गुरुवारी दुपारी ४ वाजता धरणाची पाणी पातळी ६१८ मीटर वर पोहचली. पाणी सांडवा पातळी ओलांडण्याच्या स्थितीत आल्यामुळे धरण प्रशासन सजग झाले आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत ही सांडवा पातळी ओलांडण्याची शक्यता असून जलशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून वक्रद्वाराद्वारे २८४० क्युसेक पर्यंत व विद्युतगृहातून १६६० क्युसेक असा एकूण ४ हजार ५०० क्युसेक पर्यंत पाणी विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. साहजिकच वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे. पाऊस चालू किंवा वाढत राहिल्यास. प्राप्त परिस्थितीनुसार पाणी विसर्ग कमी-अधिक करण्यात येईल. तरी नदीकाठच्या गावातील लोकांनी सतर्कता बाळगावी, असा सजगतेचा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.