किरीट सोमय्या परवडतील, पण मी नको, अशी म्हणायची वेळ मुश्रीफांवर येईल : समरजितसिंह घाटगे

किरीट सोमय्या परवडतील, पण मी नको, अशी म्हणायची वेळ मुश्रीफांवर येईल : समरजितसिंह घाटगे
Published on
Updated on

सिद्धनेर्ली : पुढारी वृत्तसेवा : भाजप नेते किरीट सोमय्या यांना मी माहिती पुरविली म्हणताहेत. पण त्यांची कारकीर्दच भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. एक वेळ त्यांना किरीट सोमय्या परवडतील; पण समरजितसिंह घाटगे नको, अशी म्हणायची वेळ येईल. आता कागलमधील त्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात यापुढची माझी लढाई असेल, असा थेट इशारा शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी  दिला.

एकोंडी (ता. कागल) येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र मंडलिक होते.

या वेळी घाटगे म्हणाले की, कागलचे मंत्री स्वतःला वडाचे झाड म्हणताहेत. मात्र ते वडाचे झाड नाहीत. वडाचे झाड तर दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे, दिवंगत सदाशिवराव मंडलिक व दिवंगत बाबासाहेब कुपेकर ही मंडळी होती. या झाडांना विळखा घालून त्यांच्या आधाराने मोठे झालेले मंत्री हे जातीयवादी विषारी वेल आहेत. ती कापण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.

या वेळी वीरेंद्र मंडलिक म्हणाले की, गोकुळमध्ये विश्वासघाताने झालेला माझा पराभव ही आमच्या गटाची भळभळती जखम आहे. राजे समरजितसिंह घाटगे व आमची चांगली मैत्री आहे. एकत्र येण्याच्या दृष्टीने आमची काही बिनसलेले नाही. त्याची मुहूर्तमेढ आज रोवली आहे.

यावेळी माजी उपसभापती विजय भोसले, शाहूचे संचालक प्रा. सुनील मगदूम, आदर्श पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सरपंच पूनम सुळगावे, उपसरपंच अक्षय चौगुले, शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, राजे बँकेचे अध्यक्ष एम.पी.पटील, प्रकाश पाटील, हिंदूराव मगदूम, दिलीप पाटोळे, रामचंद्र वैराट आदी उपस्थित होते. सुधीर पाटोळे यांनी स्वागत केले. प्रकाश सुळगावे यांनी प्रास्तविक केले. आनंदा बल्लाळ यांनी आभार मानले.

राजे मंडलिक गट एकत्र येतील

यावेळी कागल तालुक्यात सुरू असलेल्या चुकीच्या राजकारणाचा संदर्भ देत विकासात्मक राजकारणासाठी राजे व मंडलिक गटाने एकत्र येणे काळाची गरज आहे. तालुक्‍यात ब-याच ठिकाणी तशा आघाड्या झाल्या आहेत. त्यादृष्टीने एकोंडीमधील हा कार्यक्रम नांदी ठरणार आहे, असे वक्तव्य पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय भोसले व शाहूचे संचालक प्रा. सुनील मगदूम यांनी केले. त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news