

Ruturaj Kshirsagar Win KMC Election 2026 Result: कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये काही हाय व्होल्टेज लढतींकडे सर्वांचे लक्ष होते. प्रभाग क्रमांक ७ ड मधील अशाच एका लढतीकडे सर्वांचे लक्ष होते. या प्रभागातून कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे सुपूत्र ऋतुराज क्षीरसागर हे महापालिकेच्या रिंगणात होते. याच प्रभागातून माजी नगरसेवक विजय साळोखे सरदार हे अपक्ष म्हणून देखील रिंगणात होते. यात ऋतुराज क्षीरसागर यांनी विजय खेचून आणला आहे.
कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक ७ ड मधील निवडणुकीची सोशल मीडियावर चांगलीच हवा झाली होती. त्यामुळे अख्या कोल्हापुरात या लढतीकडे सर्वांचे लक्ष होते. अपक्ष अन् सोशल मीडियावर चांगले अॅक्टिव्ह असलेले सरदार साळोखे यांच्या समर्थनातून थेट अमेरिकेतून व्हिडिओ करण्यात आले होते. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होती.
मात्र शेवटी सोशल मीडियावरील हवा ही हवाच राहिली अन् आमदारपुत्र ऋतुराज क्षीरसागर यांना विजयी गुलाल लागला.
सरदार साळोखे यांचे सोशल मीडियावर कोल्हापूरच्या प्रश्नांबाबतचे रोखठोक रील्स चांगले व्हायरल होत होते. त्यांनी देखील महापालिका निवडणूक लढवताना अपक्ष उभारण्याचा निर्णय घेतला होता. ते माजी नगरसेवक असल्यानं ही लढत जोरदार होणार अशी अपेक्षा होती.
कोल्हापूरच्या इतर हाय व्होल्टेज निकालांबाबत बोलायचं झालं तर शारंगधर देशमुख यांनी विजय खेचून आणाल. सुरूवातीला ते पिछाडीवर होते. तर राहुल मानेंनी आघाडी घेतली होती. मात्र मतमोजणी जसजशी पुढे सरकली तसतशी शारंगधर यांनी बाजी मारली.
सध्याची आकडेवारी पाहिली तर जरी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येत असला तरी महायुती कोल्हापुरात सत्ता स्थापनेच्या जवळ पोहचेल असं चित्र आहे.