Kolhapur municipal corporation | टक्केवारीचा आरोप; मनपा सभेत गोंधळ

शहर अभियंता मस्कर यांच्यामुळे टक्केवारी वाढली; लेखाजोखा मांडल्यास निलंबनाची वेळ येईल : महायुतीचा हल्लाबोल
Kolhapur municipal corporation
Kolhapur municipal corporation | टक्केवारीचा आरोप; मनपा सभेत गोंधळPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : शहर अभियंतापदी रमेश मस्कर यांना पदोन्नती देण्याच्या प्रस्तावावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी आमनेसामने उभे ठाकले. सुमारे अर्धा तास अभूतपूर्व गदारोळात सभागृह अक्षरशः दणाणून गेले. 'मस्कर यांच्या काळात विकासकामांची टक्केवारी दोनवरून तीन टक्क्यांवर पोहोचली,' असा थेट गंभीर आरोप शारंगधर देशमुख यांनी केला. 'मस्कर यांच्या कारभाराची कुंडली उघडली तर त्यांच्यावर निलंबनाची वेळ येईल,' असा इशारा प्रा. जयंत पाटील यांनी दिला.

एकूणच महापालिकेत तुंबळ रणकंदन झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. काँग्रेसकडून मस्कर यांच्या पदोन्नतीसाठी जोरदार बॅटिंग करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रूपाराणी निकम होत्या. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड प्रमुख उपस्थित होते. देशमुख यांनी मस्कर यांच्यावर गंभीर आरोप करत प्रशासनाला धारेवर धरले. गेल्या वर्षभरात प्रभारी शहर अभियंता म्हणून मस्कर यांनी शहरात काय दिवे लावले? १०० कोटींच्या निधीतून माझ्या प्रभागात १७.५० कोटींचे रस्त्याचे काम मंजूर असताना त्यांनी किती वेळा प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली? हे काम वेगाने पूर्ण व्हावे म्हणून मी किमान दोनशे वेळा फोन केले, तरी ते जागेवर फिरकले नाहीत, असा आरोप केला.

टक्केवारीला उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, आयुक्तांची सहमती?

विरोधी पक्षनेता राजेश लाटकर यांनी, शहर अभियंता यांच्यानंतर वरिष्ठ म्हणून उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, आयुक्त आहेत. ते या टक्केवारीला सहमत आहेत का?, असा प्रश्‍न करीत महापालिकेत टक्केवारी वाढणे गंभीर असल्याचे सांगितले. दरम्यान, ​दोन्ही बाजूंचे नगरसेवक जागेवरून उठून समोरासमोर आल्याने सभागृहात आरडाओरड होत अभूतपूर्व गोंधळ उडाला. अखेर मस्कर यांच्या पदोन्नतीचा विषय पुढील महासभेसाठी ठेवण्यात आला.

दबावाचा चेंडू ढकलू नका...

आ. अमल महाडिक यांच्या पत्रावर शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. तावडे हॉटेल परिसरात झालेली बांधकामे नियमित करू नका, असे थेट आदेश असताना कारवाई लांबवून संशयाचे धुके निर्माण करण्याचे कारण काय, असा सवाल प्रा. जयंत पाटील यांनी केला. लाटकर यांनी चेंडू आमच्याकडे ढकलू नये, असेही प्रा. पाटील यांनी सुनावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news