

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : यंदा दसरा चौक टायटन शोरूम-उमा टॉकीज-हॉकी स्टेडियम-संभाजीनगर-देवकर पाणंद ते इराणी खण मार्गावर विसर्जन मिरवणुकीला शुक्रवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुपारी दोन वाजेपर्यंत राजारामपुरी, शाहूपुरी आणि परिसरातील मार्गावरील शंभरहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.
पारंपरिक महाद्वार रोडवरील अतिरिक्त ताण टाळण्यासाठी आणि धोकादायक इमारतीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या पुढाकारातून दोन पर्यायी मार्गांचा प्रस्ताव प्रत्यक्षात आकाराला आला आहे. समांतर विसर्जन मिरवणूक मार्गामुळे महाद्वार रोडवरील ताण काहीसा कमी झाल्याचे दिसून आले. राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या वतीने समांतर मार्गावर स्वागत मंडप उघडण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, सहाय्यक निरीक्षक भगवान शिंदे यांच्यासह अधिकाऱ्यांनी समांतर विसर्जन मिरवणूक मार्गावरून जाणाऱ्या सर्व गणरायांचे आणि पदाधिकाऱ्यांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत होते. नवीन समांतर मार्गावर ठिकठिकाणी स्वागत मंडप उभारण्यात आले होते. महापालिकेच्या वतीने पिण्याचे पाण्याची तसेच स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली होती. ठिकठिकाणी खाद्यपदार्थ तसेच लहान मुलांच्या खेळण्याचे स्टॉल उघडण्यात आले होते पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस उपाधीक्षक गृह प्रिया पाटील यांनी नवीन समांतर मार्गावरील गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीची पाहणी केली अधिकाऱ्यांना विविध सूचनाही केल्या.