हॉलीवूडच्या धर्तीवर स्टुडिओ उभारण्याचे स्वप्न अधुरे; कोल्हापुरात नितीन देसाई यांच्या आठवणींना उजाळा

हॉलीवूडच्या धर्तीवर स्टुडिओ उभारण्याचे स्वप्न अधुरे; कोल्हापुरात नितीन देसाई यांच्या आठवणींना उजाळा
Published on
Updated on

कोल्हापूर :  आपल्या देशातील निर्मात्यांना हॉलीवूडीमध्ये जाऊन चित्रीकरण करण्याची भुरळ पडते. तशी चित्रीकरणाची भुरळ परदेशातील निर्मात्यांना का पडत नाही, या प्रश्नातूनच कर्जत येथील 50 एकर विस्तीर्ण परिसरात स्टुडिओ उभारला. पटकथा ते पडदा या सर्व सुविधा स्टुडिओमध्ये मिळू लागल्या. या स्टुडिओत काही तरी कमी त्यांना जाणवत होती. अजून काही तर नवीन केले पाहिजे यासाठी त्यांची धडपड सुरू होती, पण आर्थिक स्थिती भक्कम नसल्याने आपल्या स्टुडिओच्या स्वप्ननगरीतच जीवनयात्रा संपवण्याची वेळ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर आली.

बुधवारी सकाळी नितीन देसाई यांचे निधन झाल्याचे वृत्त वार्‍यासारखे पसरले. तेव्हा कोल्हापुरातील अनेक कलाप्रेमींनी देसाई यांच्या आठवणींना उजाळा दिला. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने नितीन देसाई यांचा कोल्हापूरशी संपर्क वाढला. यातूनच त्यांचा मित्रपरिवार तयार झाला होता. कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, नवऊर्जा महोत्सव, कला महोत्सवाला उपस्थिती लावून त्यांनी आपल्या कलेचे दर्शन घडवले.

कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने ते आले होते. तेव्हा कला क्षेत्रातील कलाकारांशी त्यांनी संवाद साधला. कला दिग्दर्शन नेमके काय, याचे महत्त्व पटवून दिले. छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट बनवण्याची संकल्पना ते बोलून दाखवत. प्रेक्षकाला चित्रपटातून 'लार्जर दॅन लाईफ' अनुभूती हवी असते, असे ते म्हणत.

कोल्हापुरात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 2017 साली नवऊर्जा महोत्सवाच्या माध्यमातून देसाई यांना त्यांची कला दाखवण्याची संधी दिली. लोककला, लोकसंस्कृती, लोकदेवता यांची वेधकपणे केलेली मांडणी संस्मरणीय होती. या निमित्ताने कलेची अनुभूती कोल्हापूरकरांना आली. तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरमध्ये कला महोत्सव आयोजित केला होता. त्याचे उद्घाटन नितीन देसाई यांनी केले होते. यावेळी त्यांनी कलाकारांशी कलाक्षेत्राविषयी संवाद साधला होता; पण हॉलीवूड दर्जाचा स्टुडिओ साकारण्यासाठी आर्थिक पाठबळ त्यांना मिळाले नाही. स्टुडिओ उभारण्याचे स्वप्न साकारले; पण बदलते तंत्रज्ञान त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. ज्या सुविध परदेशातील स्टुडिओत मिळतात त्या तत्काळ आपल्या इथे उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. यासाठी ते कर्जबाजारी झाले. यातूनच स्टुडिओवर आलेली जप्तीची कारवाई त्यांच्या जिव्हारी लागली आणि याच स्टुडिओमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

भव्यदिव्य सेट असणारा एनडी स्टुडिओ

आपल्या नावाने उभारलेल्या नितीन देसाई अर्थात एनडी स्टुडिओ विषयी ते भरभरून सांगायचे. तेथे स्टोरी बोर्डिंग, एडिटिंग रूम, प्रॉप्स, तंत्रज्ञ, लाईट, फॅबि—केशन, लॉजिंग, केटरिंग आणि साऊंड स्टुडिओ यांसारख्या चित्रपट निर्मितीशी संबंधित सर्व सेवा आणि सुविधा एनडी स्टुडिओमध्ये दिल्या. राजवाडा, युरोपमधील गावे, 16 व्या शतकाच्या आसपासची घरे हे सर्व एनडी स्टुडिओमध्ये तयार केले जात होते. तलावापासून ते पर्वतांपर्यंत, सिंगापूर, मुंबई आणि अनेक युरोपीय ठिकाणांसारखे दिसणारे भव्यदिव्य सेट होते. स्टुडिओत सर्वांना प्रवेश देण्यात येत होता. केवळ चित्रीकरणासाठीच नाही तर पर्यटकांनी या स्टुडिओला भेट द्यावी, असे ते सांगत. नववर्षाच्या स्वगतासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार आणण्याबरोबरच भारतीय कलांचे प्रदर्शनही यानिमित्ताने ते भरवत होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news