

Heavy Rain in Kolhapur Rautwadi Waterfall Flow
गुडाळ : एरवी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा जुलै मध्येच प्रवाहित होणारा राऊतवाडी धबधबा धुवाँधार मान्सून पूर्व पावसाने मे महिन्यातच प्रवाही झाला आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले धबधब्याकडे वळू लागली आहेत.
गेल्या काही वर्षात राऊतवाडी धबधबा जिल्ह्यातील आणि पर जिल्ह्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. पावसाळ्यात वर्षा पर्यटन आणि त्यानंतर दिवाळीपर्यंत हजारो पर्यटक राऊतवाडी धबधब्याला भेट देत असतात. अलीकडेच दोन-तीन वर्षात राधानगरीचे आमदार आणि सध्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राऊतवाडी धबधब्याचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्यासाठी कोट्यावधींच्या निधीची तरतूद करून धबधबा स्थळ प्रेक्षणीय बनवले आहे.
पावसाळा सुरू झाला आणि धबधबा प्रवाहित झाला की पर्यटकांची पावले राऊतवाडी धबधब्याकडे वळू लागतात. वर्षा हंगामात कोकण आणि गोव्याला जाणारी पर्यटक हमखास वाट वाकडी करून राऊतवाडी धबधब्याला भेट देऊन तसेच दाजीपूर - फोंड्याकडे रवाना होत असतात.
यावर्षी मात्र ऐन मे मध्येच मान्सूनपूर्व पावसाने राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाला आहे. मे च्या शेवटच्या आठवड्यात धबधबा प्रवाहित होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे राऊतवाडीचे माजी सरपंच विश्वास राऊत यांनी सांगितले.