

कोल्हापूर : ऐन मे महिन्यात सलग पाच दिवस शहरासह जिल्ह्यात धुवाँधार पाऊस सुरू आहे. राधानगरी, तुळशी, पाटगाव या धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राजाराम, रुई, इचलकरंजी, यवलूज, शिरोळ हे पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शहरात 32 तर जिल्ह्यात सरासरी 26.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कोल्हापूरला हवामान विभागाने रविवारी (दि. 25) व सोमवारी (दि. 26) देखील ऑरेंज अलर्ट दिल्याने पुढील दोन दिवसही पावसाचेच असणार आहेत.
शहरात शनिवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू होता. पहाटे सहा ते सातच्या दरम्यान पावसाने उघडीप घेतली. यानंतर सकाळी पुन्हा जोरदार पाऊस झाला. दुपारपर्यंत अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच होती. सायंकाळी 4 नंतर मध्यम सरी कोसळत होत्या. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. पावसामुळे शहरातील सखल भागात साचलेले पाणी कायम आहे.
जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात सुरू असलेल्या पावसामुळे यंदा मे महिन्यात पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शिरोळ बंधारा संध्याकाळी 6.45 ला पाण्याखाली गेला, तर यवलूज बंधारा संध्याकाळी 7.25 वा. पाण्याखाली गेला. पंचगंगेच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ सुरू आहे. शनिवारी रात्री 9 वाजता पाणी पातळी 17 फूट 6 इंचावर होती.
जिल्ह्यातही सर्वत्र धुवाँधार पाऊस कोसळत आहे. गगगनबाबवडा तालुक्यात अतिवृष्टी (79.9) झाली आहे. याशिवाय शाहूवाडी तालुक्यात (61.5 मि.मी.), पन्हाळा (51.6), राधानगरी (35.4), करवीर (32.2), चंदगड (19.5), भुदरगड (14.3), आजरा (8), शिरोळ (6) गडहिंग्लज (4) पाऊस झाला.