शिराळा : बिबट्याचे मनुष्य व पशुधनावरील हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. याचे गांभीर्य ओळखून विशेष बाब म्हणून वन्यजीव कायद्यामध्ये दुरुस्ती करून स्वसंरक्षणासाठी बिबट्यास मारण्याची परवानगी शासनाने द्यावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी केले. टाकवे (ता. शिराळा) येथे आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत बिबट्यांची वाढती संख्या, त्यांचे माणसांवरील हल्ले यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली.
नाईक म्हणाले, संपूर्ण शिराळा तालुक्यामध्ये बिबट्याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात पशुधनाची हानी तर मोठ्या प्रमाणावर होतच आहे. याशिवाय मनुष्यांवरही हल्ल्याचे प्रमाण आता वाढत चालले आहे. तालुक्यामध्ये काही व्यक्ती तसेच लहान मुलांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. याशिवाय अनेक लोक या हल्ल्यांमध्ये गंभीर जखमी झाले आहेत. रानडुकरांचा प्रादुर्भाव वाढल्याने काही गावांतील शेती पडून राहिल्याचे चित्र आहे. सध्या शिवारात बिबट्याचा सातत्याने मोठ्या प्रमाणात होणारा वावर अतिशय धोकादायक झाला आहे. शेतकऱ्यांना अक्षरशः आपला जीव मुठीत घेऊन शेतीची कामे करावी लागत आहेत. शासनाने याची तातडीने दखल घ्यावी, तसेच याअनुषंगाने योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी. अन्यथा शासनाच्या विरोधात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. हे शासनाने ओळखून नागरिकांना दिलासा द्यावा.
सूर्यकांत रावते म्हणाले, शिराळा विधानसभा मतदारसंघातील लोकांच्या हक्कासाठी रणधीर नाईक लढा देत आहेत. शिराळा व वाळवा तालुक्यात गेली 5 ते 7 वर्षे वाढत्या बिबट्यांचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.