इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे हेच उमेदवार असतील, अशी घोषणा आमदार प्रकाश आवाडे यांनी ताराराणी पक्ष कार्यालय येथे बोलताना केली. उमेदवारी मागण्यासाठी आम्ही कोणाकडे जाणार नाही, पण जर कोणी उमेदवारी दिली तर तिचा आम्ही सन्मानाने स्वीकार करु, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ताराराणी पक्ष कार्यालयाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभात बोलत असताना त्यांनी विधानसभेसाठी डॉ. राहुल आवाडे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. ते म्हणाले, विधानसभा निवडणूकीत मी उमेदवार नसलो तरी राजकारणात सक्रिय असणार आहे. इचलकरंजीतून डॉ. राहुल आवाडे यांच्याबरोबरच अन्य तीन ते चार मतदारसंघात ताराराणी पक्षाचे उमेदवारी असतील.
विधानसभा निवडणूक होताच मी थेट भाजपाला बिनशर्त पाठींबा दिला होता. गेली पाच वर्षे सत्ता नसताना आणि असताना मी प्रामाणिकपणे त्यांचा सहयोगी घटक म्हणूनच राहिलो. त्यामुळे आगामी निवडणूकीत जो काही निर्णय ते घेतील. या संदर्भात मी वरिष्ठांशी बोललो असून विधानसभेसाठी माझ्याऐवजी राहुल आवाडे हे उमेदवार असतील असे सांगितले आहे. सध्या राहुल आवाडे हे शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही क्षेत्रात जोमाने कार्यरत आहेत.
विधानसभा निवडणूकीत प्रकाश आवाडे की राहुल आवाडे याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. ती दूर करत मी आज राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. काही मुद्यांवर मी काँग्रेस पक्षाला रामराम केला. त्यामुळे जिथून आलो तिथे परत जाण्याचा विषयच नाही. मी महायुतीचा घटक असल्याने भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट अथवा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारीची ऑफर आल्यास ती आम्ही सन्मानाने स्विकारु.
मात्र, आम्हांला उमेदवारी द्या म्हणून आम्ही कोणाच्याही दारात जाणार नाही. जर महायुतीकडून कोणाचीच उमेदवार न मिळाल्यास आम्ही आमच्या ताराराणी पक्षाच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे इचलकरंजी विधानसभा निवडणूकीत राहुल आवाडे हे उमेदवार म्हणून असणारच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मी उमेदवार नसलो तरी इचलकरंजीच नव्हे तर अन्य तीन ते चार मतदारसंघात ताराराणी पक्षाचे उमेदवारी असतील. ज्या ठिकाणी आमचे उमेदवार निवडून येतील अशा ठिकाणीच उमेदवार देऊ. जर राहुल आवाडे यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाली तर अन्य मतदारसंघातील ताराराणीतर्फे उमेदवार द्यायचे की नाहीत याचा परिस्थितीनुरुप वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असेही आमदार आवाडे यांनी सांगितले