

Kolhapur Nagaon Pothole Death
नागाव : मुलांना शाळेत सोडून घरी येत असताना दुचाकी खड्ड्यात गेल्याने दुर्दैवाने एकजण जागीच ठार झाला. दिलीप दत्ता पोवार (वय ४७, रा. नागाव फाटा, ता. हातकणंगले) असे मृताचे नाव आहे. तर एक जण किरकोळ जखमी झाला. ही घटना नागाव फाटा येथील बँक ऑफ बडोदा समोर सकाळी दहा वाजता घडली.
या बाबतची अधिक माहिती अशी की, दिलीप पोवार आज सकाळी दहाच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील शाळेत मुलांना दुचाकीवरून सोडून घरी येत असताना सेवा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांत त्याची गाडी गेल्याने तो रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, नऊ वर्षापूर्वी नागाव फाटा येथील चौकात रस्ता ओलांडताना भरधाव टेम्पोने दिलीप यांच्या दुचाकीस जोराची धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता. रूग्णालयातील योग्य उपचारामुळे ८ दिवसांनी बरा होऊन घरी परतला होता. टेम्पोच्या धडकेतून तो सुखरूप बचावला. पण आज मात्र रस्त्यावर पडलेल्या खडीने त्याचा जीव घेतला.
पुणे - बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे . योग्य खबरदारी न घेता अनेक ठिकाणी पर्यायी रस्ता वळविण्यात आला आहे. रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. दिलीपला येथील खड्ड्यांमुळे आपला जीव गमवावा लागला.