

नागाव: पुणे- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील महाडिक बंगल्याजवळ भरधाव ट्रकने दुचाकीस मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले. अपघात करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकने पुढील एका खाजगी बसलाही धडक दिली. यामध्ये तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलिसातून मिळालेली अधिक माहीती अशी की, गंभीर जखमी असलेले तोसीम हामजेखान नदाफ ( वय ४० ) हे पत्नी सुरैय्या तोसीम नदाफ (वय ३६, दोघेही रा. गांधीनगर, आष्टा) आपल्या मोटारसायकलने ( क्र. एम एच १० सी पी २३८३ ) गोकुळ शिरगाव येथे कामासाठी जात होते. ते महामार्गावरून पुलाची शिरोली येथील महाडिक बंगल्यासमोर आले असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने ( क्र. एम एच १२ एल टी ९६१८) जोराची धडक दिल्याने नदाफ दाम्पत्य रस्त्यावर पडले. यात तोसीम नदाफ व त्यांची पत्नी जखमी झाले यापैकी तौसीम गंभीर जखमी झाले आहेत.
दुचाकीस जोराची धडक देवून ट्रक-चालक जखमींना कोणतीही मदत न करता ट्रक घेवून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पुढे असलेल्या खाजगी बसलाही (क्र. जी ए ०३ व्ही ७२४५ ) धडक दिली. यात ट्रक, बस, दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबतची फिर्याद रमजान शब्बीर नदाफ यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे .