

Gajapur High School Unique Student Welcome
विशाळगड : गजापूर (ता. शाहुवाडी) येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात शाळेच्या पहिल्याच दिवशी 'दै. पुढारी' वृत्तपत्राच्या 'पायपीट' उपक्रमांतर्गत डोंगरवाटा तुडवत, पायपीट करत शाळेत येणाऱ्या २५ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय उपयोगी भेटवस्तू व शुभेच्छा पत्र देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत करून त्यांच्या जिद्दीला सलाम आणि संघर्षाला बळ दिले. या स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकला आणि त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष संजयसिंह पाटील होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, विशेषतः डोंगरवाटा तुडवत शाळेपर्यंत पोहोचणे ही एक मोठी कसरत असते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची जिद्द न सोडता नियमित शाळेत येणाऱ्या या विद्यार्थ्यांचे कौतुक व्हावे आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने 'दै. पुढारी'ने 'पायपीट' नावाचा एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम शाळेच्या पहिल्याच दिवशी राबवला.
या उपक्रमासाठी शाहूवाडी तालुक्यातून गजापूर येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाची निवड करण्यात आली होती. या शाळेत विशाळगड, केंबुर्णेवाडी, मुसलमानवाडी, दिवाणबाग, बौद्धवाडी आणि भाततळी येथून दररोज २ ते ५ किलोमीटरची पायपीट करत जंगलव्याप्त भागातून आणि वन्यप्राण्यांच्या धोक्यातून विदयार्थी शाळेला येतात. 'दै. पुढारी'ने येथील २५ विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप, शालेय उपयोगी भेटवस्तू आणि शुभेच्छा पत्र देऊन विद्यार्थ्यांच्या जिद्दीला सलाम आणि संघर्षाला बळ दिले.
कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजयसिंह पाटील, संस्था सचिव व माजी उपसरपंच शरद पाटील, ग्रा पं सदस्य मंगेश पाटील, मुख्याध्यापक के. ए. पाटील, एस. टी. पाटील, टी. टी. सुतार, सचिन चव्हाण, सुनील नारकर, श्रीकृष्ण कांबळे, आनंद जाधव, तसेच 'पुढारी' प्रतिनिधी सुभाष पाटील आणि शशांक पाटील आदी उपस्थित होते.
'दैनिक पुढारी'ने 'पायपीट' उपक्रम राबवून या दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ दिले आहे. त्यांचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी अधिक वाढेल आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल, याची मला खात्री आहे.
- संजयसिंह पाटील, संस्थापक अध्यक्ष
'दै. पुढारी'चा 'पायपीट' उपक्रम हा केवळ शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम नाही, तर दुर्गम भागांतील मुलांच्या शिक्षणाची प्रेरणा आहे. ही मुले दररोज मैलोन्-मैल चालत शाळेत येतात, त्यांच्या संघर्षाला सलाम करत, त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले आहे.
- शरद पाटील, माजी उपसरपंच
शाळेला चार किलोमीटर चालत येते. कधी कधी खूप दम लागतो, पण शाळेत येण्याची इच्छा खूप असते. आज दैनिक 'पुढारी'कडून मिळालेले शालेपयोगी वस्तू आणि शुभेच्छा पत्र पाहून खूप आनंद झाला. आता शाळेत येण्याचा उत्साह आणखी वाढला आहे. या उपक्रमामुळे आम्हाला खूप मदत झाली आहे, आणि भविष्यात खूप शिकून मोठे होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली आहे. 'दै. पुढारी'चे मी मनापासून आभार मानते.
- दीक्षा पवार, विद्यार्थिनी
'दैनिक पुढारी'चा 'पायपीट' उपक्रम विद्यार्थ्यांच्या जिद्दीला सलाम करणारा आणि त्यांना बळ देणारा आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ शालेय साहित्यच मिळाले नाही, तर त्यांच्या मनात शिक्षणाविषयी एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. अशा प्रेरणादायी उपक्रमांसाठी 'दैनिक पुढारी'चे मनापासून आभार !
- के. ए. पाटील, मुख्याध्यापक, गजापूर हायस्कूल