पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील कोणताही प्रकल्प बाहेर गेलेला नाही.याबाबत विरोधकांनी पुरावा द्यावा, संभ्रम निर्माण करण्याचे काम करू नये. माजी पर्यावरण मंत्री यांना उद्योग मंत्रालयाच्या पैशांतून दाओसला जाण्याचे कारण नव्हते. पण ते पर्यटनासाठी गेले. उद्योगपतीच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याने भीतीमुळे काही उद्योग बाहेर गेले. परंतु, महायुतीच्या काळात महाराष्ट्रात उद्योगांचा झपाट्याने विकास होत आहे. दावोसमधून ५ लाख कोटींची गुंतवणूक आणली, त्यातून अनेक प्रकल्प सुरू होण्याच्या तयारीत आहे, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज (दि. १३) स्पष्ट केले.
पुढारी NEWS' च्या 'विचार मान्यवरांचे, स्वप्न नव्या महाराष्ट्राचे' या संकल्पनेवर आयोजित कार्यक्रमात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज (दि.१३) ऑनलाईन संवाद साधला. यावेळी पुढारी न्यूजचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक सुरु आहे. राज्याची उद्योग हब बनण्याकडे वाटचाल सुरू आहे. राज्यात ८० हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. विदर्भात अनेक गोष्टी केल्या जात आहोत. विदर्भाला स्टील हब बनविले जाईल. कोकणातील रत्नागिरीत सेमी कंटक्टरचा प्रकल्प उभा केला जाणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहेत. उद्योजकांसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे तत्काळ परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आम्ही उद्योग कसे आणायचे याचा धडा विरोधकांनी देऊ नये. पायाभूत सुविधांवर त्यांनी बोलू नये, अशी टीका सामंत यांनी केली.