कोल्हापूर : गणेशोत्सवात गणेशमूर्ती आगमनादिवशी आणि अनंत चतुर्दशी याच दिवशी सार्वजनिक मंडळांना मिरवणुकीसाठी परवानगी मिळणार आहे. इतर दिवशी मिरवणुका काढण्यावर पोलिस प्रशासनाने निर्बंध घातले असून संबंधितांवर गुन्हे दाखल होणार आहेत. यानुसार आगमन मिरवणुका सोमवार, दि. १४ सप्टेंबर तर विसर्जन मिरवणूक शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर रोजीच परवानगी दिली आहे.
गणेशोत्सवाचे आकर्षण कोल्हापूरसह लगतच्या जिल्ह्यातही आहे. यामुळे राजारामपुरीतील आगमन तर महाद्वार रोडवरील विसर्जन मिरवणुकांना मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र साऊंड सिस्टीमला १२ वाजेपर्यंतच परवानगी असल्यामुळे अनेक मंडळांनी आगमन व विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी सुरू केली आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेसह सर्वसामान्य नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास होतो. शनिवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी आगमन व विसर्जन मिरवणूक ज्या त्या दिवशीच होतील. या व्यतिरिक्त आगमन व विसर्जन मिरवणुकांना पोलिस प्रशासनाच्या वतीने परवानगी नाकारली आहे. ज्या मंडळांचे आगमन ठरवून दिलेल्या तारखांशिवाय अन्य तारखांना होईल, त्यांच्या मिरवणुकांना परवानगी नसून त्यांनी मिरवणूक काढल्यास गुन्हेही दाखल होणार आहेत.