Bhaiyya Mane : भैय्या माने यांची मतदारांना भावनिक साद! ‘पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव यांचा विजय हाच आपला विजय!’

Pune Graduate Constituency election : माने आणि जाधव घराण्यांमध्ये तीन पिढ्यांपासून ऋणानुबंध असून कोल्हापूरच्या सूनबाईंच्या पाठीशी मी आणि माझा मतदार खंबीरपणे उभा आहे.
Bhaiyya Mane
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप उर्फ भैय्या माने.
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव यांचा विजय हाच आपला विजय आहे. गेल्या दीड वर्षापासून आपण या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली नाही. त्यामुळे युतीधर्म पाळत महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आता त्यांना विजयी करून विधान परिषदेत पाठविणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, अशी भूमिका या मतदारसंघातून उमेदवारी मागे घेत डॉ. स्मिता जाधव यांना पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप उर्फ भैय्या माने यांनी स्पष्ट केली.

दीड वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्याला निवडणूक लढविण्यासाठी मतदार नोंदणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी या मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण यंत्रणा आपल्या पाठीशी उभी केली होती. त्यानुसार पाचही जिल्ह्यांतील गावागावांत, वाड्या-वस्त्यांवर फिरून आपण मतदार नोंदणी केली. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली नाही. महायुतीत ही जागा भाजपकडे गेली आणि भाजपने डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली. आपण मतदार नोंदणीचे काम केले असतानाही पक्षाला उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र, युतीधर्म पाळण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे माने यांनी सांगितले.

माने आणि जाधव घराण्यांमध्ये तीन पिढ्यांपासून ऋणानुबंध आहेत. हे संबंध लक्षात घेऊनच निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला. गेल्या पंधरा वर्षांपासून आपण शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य, मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य आणि ॲकॅडमिक कौन्सिलचे सदस्य म्हणून भरीव काम केले आहे. या माध्यमातून अनेक महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून काम करताना शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ या नेत्यांनी आपल्याला बळ दिले. शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर आपण सातत्याने आवाज उठविला आहे. मात्र, पक्षाला उमेदवारी मिळाली नाही, असेही माने यांनी सांगितले.

आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे आणि समित कदम यांच्याशी चर्चा झाली. मतदार नोंदणीसाठी केलेले काम पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रभावित झाले होते. मात्र, युतीधर्म पाळण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला. त्या वेळी कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत आलेले अश्रू हीच आपली खरी पुंजी आहे, अशा भावनिक शब्दांत माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यामागील भूमिका स्पष्ट केली.

डॉ. स्मिता जाधव यांना दिलेला पाठिंबा जाहीर आहे. आपले सर्व कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि मतदार नोंदणीच्या कामात सावलीप्रमाणे सोबत राहिलेले सहकारी आता डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. या कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याची ताकद डॉ. जाधव यांना मतपेटीतून अनुभवायला मिळेल. त्या उच्चशिक्षित असून, त्यांच्या पाठीशी पुढारी वृत्तपत्र समूहाचा वारसा आहे. त्या कोल्हापूरच्या सूनबाई आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला आहे, असेही माने यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news