

Prada Kolhapuri Chappals
कोल्हापूर: सुरुवातीला कोल्हापुरी चप्पलच्या डिझाईनची नक्कल करून त्याचे श्रेय नाकारणाऱ्या प्राडा कंपनीने आता आपली चूक सुधारली असून, 'कोल्हापुरी पायताण'पासून प्रेरित होऊनच लेदर चप्पल बनवल्याचे अधिकृतपणे मान्य केले आहे. या संदर्भात कंपनीने एक खास व्हिडिओ शेअर केला असून, त्यात कोल्हापूरच्या स्थानिक कारागिरांच्या कौशल्याची झलकही दाखवण्यात आली आहे.
प्राडाने कोल्हापुरी चप्पलशी साधर्म्य असणारी लेदर चप्पल जागतिक बाजारात आणली होती. मात्र, यासाठी कोल्हापूरच्या कलेचा कोणताही उल्लेख न केल्याने कोल्हापूरकरांसह देशभरातून संताप व्यक्त झाला होता. 'पुढारी न्यूज'ने या विषयावर प्रकाश टाकत जनसामान्यांच्या भावना प्रभावीपणे मांडल्या होत्या. या वाढत्या दबावामुळे प्राडाच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूरचा दौरा केला आणि आता या कलेचा सन्मान करत आपली भूमिका बदलली आहे.
प्राडाने आपल्या 'लिमिटेड एडिशन' चप्पल संग्रहासाठी 'मेड इन इंडिया' आणि 'इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी' असे लेबल वापरले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक भागातील कुशल कारागिरांनी या चपलांची निर्मिती केली आहे. भारतीय वारसा आणि आधुनिक लक्झरी यांचा हा एक अनोखा मिलाफ असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
केवळ श्रेय देऊन न थांबता, प्राडा समूहाने भारतीय कारागिरांसाठी एका विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च प्राडा उचलणार असून, 'लिमिटेड एडिशन' चपलांच्या विक्रीतून मिळणारा नफाही यासाठी वापरला जाणार आहे. कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या भारतातील आठ जिल्ह्यांमधील कारागिरांना याचा थेट लाभ मिळेल, असे प्राडाने म्हटले आहे.
हा प्रशिक्षण कार्यक्रम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आणि कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ लेदर अँड फॅशन टेक्नॉलॉजी यांच्या सहकार्याने राबवला जाणार आहे. बदलत्या बाजारपेठेनुसार डिझाईन आणि तांत्रिक कौशल्ये विकसित करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. "हा पुढाकार म्हणजे शिक्षण आणि संस्कृतीमध्ये गुंतवणूक करण्याच्या आमच्या दीर्घकालीन वचनबद्धतेचा एक भाग आहे," असे प्राडाने स्पष्ट केले आहे.