[author title="डॅनियल काळे" image="http://"][/author]
कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या प्रदूषणास जबाबदार असणार्या घटकांवर आजवर नोटिसांचे कागदी घोडे नाचवत केवळ जुजबी करावाई झाल्याने नदी प्रदूषणाने रौद्र रूप धारण केले आहे. पंचगंगा नदीच्या खोर्यातून दररोज 200 एमएलडी सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट पंचगंगेत मिसळत आहे. परिणामी नदीतील जलचरांचे जीव जात आहेत; तसेच नदीकाठावरील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरीदेखील प्रदूषण करणारे घटक मोकाटच आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाईचा केवळ फार्स करत असल्याने कारवाईची भीतीच उरली नाही. त्यामुळे पंचगंगेच्या प्रदूषणाने रौद्र रूप धारण केले आहे. प्रदूषणाचा विळखा घट्ट होत असताना वेळीच उपाययोजना करायला हव्यात. अन्यथा जलचरांसोबतच नागरिकांच्याही जीवाला धोका आहे.
पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गेली 30 वर्षे कोल्हापूर ते इचलकंरजीपर्यंतच्या नागरिकांना भेडसावत आहे. इतकी वर्षे चर्चा होऊनही नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी काही अपवाद वगळले तर ठोस उपाययोजना झालेली नाही. यामध्ये कोल्हापूर महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे केले असले तरीही आता पाण्याचा वापर दुपटीने वाढल्याने सांडपाण्याचा ओव्हरफ्लो नदीत वाढत आहे.
मैलायुक्त सांडपाणी
पंचगंगा खोर्यामध्ये कोल्हापूर आणि इचलकंरजी या प्रमुख दोन महापालिका येतात. या दोन्ही महापालिकांचे मैलायुक्त सांडपाणी मोठ्या प्रमाणात नदीत मिसळते. कोल्हापूर महापालिकेचे दोन एसटीपी आहेत. परंतु याद्वारे केवळ 100 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होते. थेट पाईपलाईन योजनेनंतर शहरात पाण्याचा वापर वाढल्याने एकट्या कोल्हापूर शहरातून सुमारे 100 एमएलडी पाण्याचा ओव्हरफ्लो नदीत मिसळले जात असल्याचा अंदाज आहे. इचलकंरजी शहर व खोर्यातील 79 गावांतून सुमारे 100 एमएलडी असे 200 एमएलडी सांडपाणी पंचगंगेत मिसळते.
आंदोलनानंतरच प्रदूषण नियंत्रण मंडळाला येते जाग
पंचगंगा नदीच्या प्रदूषणाची चर्चा गेली तीन दशके सुरू आहे. परंतु काही अपवाद वगळता कोणत्याच उपाययोजना झालेल्या नाहीत. नदीचे प्रदूषण रोखण्याची सामूहिक जबाबादारी ही सर्वांचीच असली तरी यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळ नावाचा स्वतंत्र विभाग आहे. आंदोलने झाली किंवा कोणी तक्रार केली तरच या विभागाला जाग येते. त्यामुळे हा प्रदूषण नियंत्रण विभाग आहे की प्रदूषण विभाग आहे, असा प्रश्न पडतो. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याच्या कामात आजवर आंदोलकांनी तक्रारी केल्यानंतरच पंचनामे करणे, कारणे दाखवा नोटिसा पाठविणे अशा स्वरूपाची जुजबी कारवाई करून कागदी घोडे नाचविण्यात आले.
कचराही थेट नदीत
कोल्हापूर महापालिका, आजूबाजूची गावे, नदी खोर्यातील गावे, इचलकरंजी शहर येथील कचर्यावर प्रक्रिया करणारी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे कचरा संकलन करणे इतकेच काम आहे. बहुतांशी कचरा गटारी, नाल्यातून थेट नदीत वाहत जातो. प्रदूषणात कचर्याचे प्रमाणही मोठे आहे.
प्रदूषणाची प्रमुख कारणे
* मैलायुक्त सांडपाणी.
* साखर कारखान्यातील रसायनयुक्त सांडपाणी.
* हॉस्पिटल्स, दवाखाने, प्रयोगशाळांमधून बाहेर पडणारे सांडपाणी.
* सर्व्हिसिंग स्टेशन, कत्तलखाने, मासळी बझार, हॉटेल, फेरीवाले याद्वारे प्रदूषण.
* रासायनिक खतांमुळे वाढणारे प्रदूषण.
* निर्माल्य, स्मशानातील राख आदींद्वारे होणारे प्रदूषण.
* जनावरे धुणे, कपडे धुणे, वाहने धुणे.
* दोन शहरे आणि 174 गावांतील सांडपाणी थेट नदीत मिसळल्याने होणारे प्रदूषण.