Politics In Kolhapur: सुंभ जळाला तरीही पीळ काही जात नाही : खा. धनंजय महाडिक

खा. धनंजय महाडिक
खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : 'सुंभ जळाला तरीही पीळ काही जात नाही' अशा शब्दांत खा. धनंजय महाडिक यांनी आपले पारंपरिक विरोधक आ. सतेज पाटील यांच्यावर त्यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. निमित्त होते दहीहंडी कार्यक्रमाचे.

गेल्या दहा वर्षांपासून धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीने दसरा चौकामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमात दहीहंडी कोणता संघ फोडणार याबद्दल जशी उत्सुकता असते त्याचबराबेर महाडिक काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असते. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या दहीहंडीकडे असते. दहीहंडीच्या सलामीला सुरुवात होण्यापूर्वी खा. धनंजय महाडिक यांनी आपले उद्घाटनपर भाषण केले.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण गोपालकाला करतो. आजचा दिवस शुभ आहे. या चांगल्या दिवसावर आपण काही बोलणार नाही, पण 'गोकुळ', 'राजाराम'चे राजकारण काही तरी ऐकायला येऊ लागले आहे. यावर मी आज काय बोलणार नाही. कारण 'रस्सी जल गयी मगर बल नही गया' या म्हणीप्रमाणे त्यांची अवस्था आहे. यासंदर्भात लवकरच आपण आपली भूमिका, मत व्यक्त करणार आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या तालमीतील आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यांनी दिलेला मंत्र आणि त्यांनी दिलेले कार्य पुढे घेऊन जाणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आजच्या चांगल्या दिवसावर त्यावर न बोलता योग्य वेळी त्याचा समाचार घेतला जाईल, असे महाडिक म्हणाले.

ते पुढे म्हणाले, दहा वर्षांपूर्वी दहीहंडी कार्यक्रमाला सुरुवात केली तेव्हा जिल्ह्यात फक्त 3 संघ होते. प्रत्येक वर्षी विजेत्या संघाला 3 लाखांचे पारितोषिक तसेच वैयक्तिक आकर्षक बक्षिसे देत असल्यामुळे संघाची संख्या वाढू लागली. आज जिल्ह्यात 24 संघ तयार झाले आहेत हे धनंजय महाडिक युवा शक्तीच्या दहीहंडीचे यश आहे.

प्रत्येक पथकाला दहा हजार रुपये देण्याची घोषणा पालकमंत्री दीपक केसकर यांनी केली आहे. त्याप्रमाणे कोल्हापुरात येणार्‍या सर्व गोविंदा पथकांना ही रक्कम देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news