कोल्हापूर : ढसाढसा रडत जयकुमार शिंदे यांचा राजकीय संन्यास

कोल्हापूर : ढसाढसा रडत जयकुमार शिंदे यांचा राजकीय संन्यास
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा, शहरवासीयांच्या प्रत्येक आंदोलनात अग्रभागी असणार्‍या, घरावर तुळशीपत्र ठेवून, संसाराची राखरांगोळी झाली तरीही समाजकारण आणि राजकारणात सक्रिय काम करताना प्रत्येक क्षणाला उपस्थितांना हसवणारा जयकुमार शिंदे शुक्रवारी मात्र, ढसाढसा रडला. परिस्थितीपुढे हतबल झालेल्या शिंदे यांनी राजकीय संन्यास घेत, राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा (ग्रामीण) उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

जयकुमार शिंदे काय म्हणाले?

  • परिस्थितीपुढे हतबल होत जयकुमार शिंदे यांनी राजकीय संन्यास घेतला.
  • समाजकारण अखेरच्या श्वासापर्यंत करत राहू.
  • राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांनी माझ्याकडे कानाडोळा केला.
  • माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले.
  • पडत्या काळात दै. 'पुढारी'चे संपादक प्रतापसिंह जाधव यांनी मला रिक्षा घेऊन दिली. त्यावर माझा उदरनिर्वाह सुरू होता.

अगोदर पोटाचे बघा आणि त्यानंतर राजकारण करा, अस शिंदे का म्हणाले?

यापुढे आपण कोणत्याही राजकीय पक्षाचे काम करणार नाही. या निर्णयाबाबत माजी मंत्री शरद पवारांचे देखील ऐकणार नाही; मात्र समाजकारण अखेरच्या श्वासापर्यंत करत राहू, असेही त्यांनी सांगितले. 'अगोदर तुमच्या पोटाचे बघा आणि त्यानंतरच राजकारण करा', असा सल्लाही त्यांनी तरुण कार्यकर्त्यांना दिला. राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांनी माझ्याकडे कानाडोळा केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात परिचित जयकुमार शिंदे यांचा रिक्षा ड्रायव्हर, सामाजिक कार्यकर्ता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ग्रामीण उपाध्यक्ष असा गेल्या 35 वर्षांचा राजकीय प्रवास संघर्षमय आहे. मात्र, राजकारणात हतबल झाल्याचे सांगत शिंदे म्हणाले, एस काँग्रेस, आय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असा माझा गेल्या 35 वर्षांपासूनचा राजकीय प्रवास सुरू आहे. दिवंगत मंत्री बाबासाहेब कुपेकर, दिग्विजय खानविलकर, सदाशिवराव मंडलिक यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी आपआपल्या परीने मदतीचा हात दिला. शरद पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना माझ्या मुलाला नोकरीस घेण्यास वारंवार सांगितले. मंत्री मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेत कंत्राटी म्हणून मुलाला नोकरी दिली, पण तीन ते चार महिने पगारच मिळत नव्हता. चांगल्या ठिकाणी मुलाला नोकरी द्या, असे मी वारंवार सांगत होतो; मात्र आमची फसवणूक झाली, असेही त्यांनी सांगितले.

माझ्या मुलाला कायमची नोकरी नसल्याने तो नैराश्येत होता. त्यात आईचे निधन झाल्याने त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळा होता. अचानक त्याने आत्महत्या केली. यामुळे माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. या पत्रकार बैठकीला अभिजित मोहिते, अनिल कोळेकर, धनाजी यादव उपस्थित होते.

दै. 'पुढारी'चे संपादक प्रतापसिंह जाधव, मालोजीराजे यांची कायम मदत

पडत्या काळात दै. 'पुढारी'चे संपादक प्रतापसिंह जाधव यांनी मला रिक्षा घेऊन दिली. त्यावर माझा उदरनिर्वाह सुरू होता. सामाजिक कार्यात असल्याने अनेकजण मोफत प्रवास करायचे. त्यामुळे रिक्षा बंद केली. कुटुंब कसे चालवायचे असा प्रश्न माझ्या समोर होता, पण प्रतापसिंह जाधव, मालोजीराजे यांनी दिलेल्या अखंड मदतीचा हात यामुळे कुटुंब सावरल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

शिंदे यांच्याकडून खदखद व्यक्त

पक्षाचे काम करताना इतक्या वर्षात काय कमावले आणि काय गमावले हे सतत आठवत आहे. असे सांगत शिंदे ढसाढसा रडले. यावेळी त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मनात असलेली खदखद व्यक्त केली.

12 पैकी 7 गुन्हे निकाली

जिल्ह्यातील एखादे दुसरे आंदोलन सोडले तर मी प्रत्येक आंदोलनात पुढे होतो. यामध्ये टोल, ऊस, मराठा क्रांती मोर्चा, खंडपीठ, पाणी पुरवठा, खराब रस्ते, पंचगंगा प्रदूषण अशी आंदोलने केली आहेत. यामध्ये माझ्यावर एकूण 12 गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी 7 निकाली निघाले आहेत. अजून 5 गुन्हे न्याय प्रविष्ठ आहेत. न्यायालयाची एकही तारीख मी चुकविलेली नसल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

अजित पवार यांच्यावर टीका

शिंदे यांनी उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील सडकून टीका केली. त्यांनी शरद पवारांना तर स्थानिक नेत्यांनी आम्हाला छळल्याचे सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news