

कोल्हापूर, दिलीप भिसे : कोल्हापूर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्यांसह पोलिसांना बदल्यांचे वेध लागले आहेत. पोलिस ठाण्यात दोन, जिल्ह्यात चार वर्षे कार्यकाळ पूर्ण झालेल्या सात प्रभारी अधिकार्यांसह पोलिस ठाण्यात पाच वर्षे सेवा झालेल्या 650 पोलिसांच्या काही दिवसांत बदल्या शक्य आहेत. पोलिस कर्मचार्यांना विश्वासात घेऊन प्रक्रिया राबविण्यासाठी वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या पंधरवड्यात कार्यवाही शक्य आहे, असे सांगण्यात आले.
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर…
2020 मध्ये पोलिस ठाण्यात पाच वर्षांचा कार्यकाळ झालेल्या 450, तर 2021 मध्ये 300 पोलिसांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, 2022 मध्ये स्थगिती आदेशामुळे प्रक्रिया थांबली होती. दोन वर्षांच्या काळानंतर पोलिस ठाण्यात पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलिसांच्या बदल्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
बदल्यांची लवकरच कार्यवाही
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नियमानुसार कार्यकाळ झालेल्या 650 वर पोलिस कर्मचार्यांच्या एप्रिल पंधरवड्यात जिल्हांतर्गत बदल्या शक्य आहेत, असे संकेत दिले आहेत. त्यानुसार दि. 17 ते दि. 20 एप्रिल काळात बदल्यांची कार्यवाही होईल, असे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात येते.
प्रभारी अधिकार्यांच्या बदल्यांचे संकेत
पोलिस कर्मचार्यांसह जिल्ह्यात चार आणि पोलिस ठाण्यात दोन वर्षांचा कार्यकाळ झालेल्या किमान 8 अधिकार्यांच्या बदल्या अपेक्षित आहेत. त्यात लक्ष्मीपुरी, शिरोळ, कुरूंदवाड, गांधीनगर, गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यांतील प्रभारी अधिकार्यांचा समावेश आहे.
गुन्हेगारांचे कर्दनकाळ!
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी 30 सप्टेंबर 2020 मध्ये कोल्हापूरमध्ये पदभार स्वीकारला. त्यांच्या कारकिर्दीला 30 महिन्यांचा कालावधी होत आहे. कडक शिस्त, संघटित गुन्हेगारी टोळ्यांसह काळेधंदेवाले, तस्करांचे कर्दनकाळ ठरलेल्या पोलिस अधीक्षकांनी कोल्हापूर पोलिस दलाचा दबदबा निर्माण केला आहे. त्यांचीही बदली येत्या काही दिवसांत शक्य आहे.
निकेश खाटमोडे-पाटील यांच्याकडे प्रभारीपदाची सूत्रे
पोलिस अधीक्षक बलकवडे काही काळासाठी रजेवर आहेत. या काळात गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्याकडे पोलिस अधीक्षकपदाची प्रभारी सूत्रे सोपविण्यात आली आहेत. शुक्रवारी सकाळी त्यांनी पदभारही स्वीकारला.