पोलिस भरतीवर पावसाचे ‘पाणी’

पोलिस भरतीवर पावसाचे ‘पाणी’

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहर व परिसरात गुरुवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील बहुतांश चौकांना नाल्याचे स्वरूप आले होते. भरती प्रक्रियेंतर्गत मैदानी चाचणी घेण्यात येत असलेल्या पोलिस कवायत मैदानावरही पावसामुळे पाणीच पाणी झाले होते. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने भरती प्रक्रियेवर पावसाने पाणी फिरविले. पावसाचा अडथळा आल्याने शुक्रवारी पहाटे पाच वाजल्यापासून मैदानावर भरती सुरू होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दोन दिवसांत 1,544 उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. एकूण 2,800 उमेदवारांना भरतीसाठी बोलविले होते. त्यापैकी 307 उमेदवार अपात्र ठरले. पोलिस कवायत मैदानावर भरती प्रक्रिया सुरू असून, 27 जूनपर्यंत चालणार आहे.

गुरुवारी भरतीसाठी 1,400 उमेदवारांना पत्रे पाठविण्यात आली होती. उमेदवारांच्या कागदपत्रांच्या तपासणीसाठी 14 टेबल ठेवण्यात आली होती. पहाटे 5 वाजता कागदपत्रांची तपासणी सुरू झाली. त्यापैकी मैदानी चाचणीस प्रत्यक्ष 921 उमेदवार हजर होते, तर 144 उमेदवार कागदपत्रांसह विविध कारणांनी अपात्र ठरले. त्यामुळे 777 उमेदवारांची छाती, उंची मोजून 100 मीटर आणि 1,600 मीटर धावणे तसेच गोळाफेक आदी मैदानी चाचण्या घेण्यात आल्या. 2 उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी पुढील तारीख देण्यात आली. तसेच 19 जूनला उपस्थित राहू न शकलेला 1 उमेदवार गुरुवारी भरतीसाठी हजर होता. आरएफआयडी व फेस रेकगनायझेशन या संगणकीय यंत्रणांचा वापर करून भरती प्रक्रिया पारदर्शी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news