

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत यंदा कोल्हापूरचा टक्का घसरला आहे. शहर व ग्रामीणचे जिल्ह्यात 83 शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आहेत. पाचवी ग्रामीण राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत विद्यामंदिर खामकरवाडीचा पीयूष संभाजी पाटील व सेंट्रल स्कूल तारळे खुर्दचा सिद्धेश शैलेश आंबेकर यांनी दुसरा क्रमांक पटकाविला. शहरी राज्यस्तरीय यादीत आठवीच्या शिष्यवृत्तीत विजयमाला डी. शिंदे हायस्कूलची उपासना दीपक सोनटक्के हिने दुसरे स्थान मिळवले.
पाचवी ग्रामीणमध्ये राज्य गुणवत्ता यादीतील 121 पैकी 28 तर शहरीमध्ये 113 पैकी 16 विद्यार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. आठवीच्या शिष्यवृत्तीत शहरस्तरीय राज्य यादीतील 102 पैकी 13 तर ग्रामीणच्या 102 मधील 26 विद्यार्थी आहेत. पाचवी शहरी राज्य गुणवत्ता यादीत श्री अवधूत विद्यालयाचा समर्थ श्रीकांत पाटील याने सातवा क्रमांक मिळवला. आठवीच्या शहरस्तरीय राज्य गुणवत्ता यादीत पी.बी.पाटील हायस्कूलचे अथर्व देवानंद हासबे आणि रोहित महेश पाटील यांनी अनुक्रमे सहावा क्रमांक पटकाविला.
भुदरगड तालुक्यातील पाचवी शिष्यवृत्तीत 76 तर आठवीमध्ये 80 असे मिळून 156 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. भुदरगड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर कागल (139) व राधानगरी (124) अनुक्रमे दुसर्या, तिसर्या तीन क्रमांकावर आहेत. शहरी विभागात कोल्हापूर महापालिकेचे पाचवीचे (116) तर आठवीचे (58) विद्यार्थी आहेत. महापालिका शाळेतील 174 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीत यश मिळवले आहे. 1,162 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असून, 19 टक्के गुणवत्ताधारक विद्यार्थी जिल्ह्यातील आहेत. पाचवी ग्रामीण (347), शहरी (244) असे मिळून 591 विद्यार्थी शिष्यवृत्तीत आले आहेत. आठवी ग्रामीणमध्ये (371) व शहरीत (200) असे 571 विद्यार्थी गुणवत्तेत आहेत. पाचवी शिष्यवृत्ती निकालाची टक्केवारी (38.96) तर आठवीची (26.71) टक्के आहे.