

सुभाष पाटील
विशाळगड : नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या अलौकिक पराक्रमाची आणि प्राणार्पणाची साक्ष देणारी ऐतिहासिक पावनखिंड स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य दीपोत्सवाने लख्ख उजळून निघाली. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने या पावनभूमीचा परिसर दुमदुमून गेला.
स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. झुंजार माने यांच्या हस्ते सुरुवातीला नरवीर बाजीप्रभूंच्या स्मृतिस्थळाचे पूजन करण्यात आले आणि दीपोत्सवाची सुरुवात झाली. यावेळी स्मृतिस्थळ आणि पायरी मार्ग शेकडो पणत्यांनी प्रकाशित झाला.
दीपोत्सव हा प्रकाशाचा उत्सव आहे, याच औचित्याने मराठ्यांच्या दैदीप्यमान इतिहासाला उजाळा देण्यासाठी स्वराज्य प्रतिष्ठान आणि युगंधर फिल्म प्रोडक्शन यांनी हा दीपोत्सव साजरा केला. डॉ. झुंजार माने यांनी यावेळी सांगितले की, "ज्या गड-किल्ल्यांमुळे आणि ऐतिहासिक पावनभूमीमुळे आज आपण घराघरात दिवाळी साजरी करतो, तेच गड-किल्ले ऐन सण-उत्सवांमध्ये अंधारात असतात. एकांतात असलेल्या या ऐतिहासिक वारसदारांना मानवंदना देण्यासाठी आम्ही हा दीपोत्सव साजरा करत आहोत." शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि बाजीप्रभूंच्या पराक्रमाने पावन झालेल्या या भूमीचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक शिवप्रेमीने घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
बदलत्या काळात तरुणाईला इतिहासाचे भान सुटू नये आणि गड-किल्ल्यांचे महत्त्व कळावे, यासाठी प्रतिष्ठान सतत प्रयत्नशील असते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र उजळला, पण त्यांनी घडवलेले अनेक किल्ले दीपावलीच्या काळात अंधारात असतात. हेच हेरून प्रतिष्ठान गेल्या सहा वर्षांपासून पावनखिंडीत दीपोत्सव साजरा करत आहे.
दीपोत्सवासाठी डॉ. झुंझार माने यांच्यासह सचिन चौगले, संदीप पाटील, प्रविण पांढरे, विश्वजीत पांढरे आदींसह अनेक शिवभक्त उपस्थित होते. प्रतिष्ठानतर्फे दर महिन्याच्या एका रविवारी पावनखिंडीत स्वच्छता मोहीम राबवून शिवकार्य केले जाते.