

कासारवाडी : हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी, जुने-नवे पारगावसह परिसरात गवे, बिबट्याने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. या परिसरात रोज गवे, बिबट्या वावरत आहेत यामुळे सर्वत्र भीती आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसापासून पारगाव परिसरात बिबट्याचे निदर्शनास येत होता. बुधवारी रात्री वारणा दुध संघाच्या पशुखाद्य व वॅप्कॉस आईस्क्रिम फॅक्टरी परिसरात वारणा दुधचे सुरक्षा रक्षक कृष्णात पाटील यांना पेट्रोलिंग दरम्यान मोकळ्या माळावरून बिबट्याचा निदर्शनास आला. पाटील यांनी त्याचा मागोवा घेतला असता सदर बिबट्या पिछाडीस असणारे वसंत पाटील यांच्या शेतात गेला याबाबत जुने पारगावचे सरपंच तुकाराम पोवार यांनी नरंदे वनपाल कुंडलीक कांबळे याना कळवले.
वनविभागाने पाहणी केली असता सदर बिबट्याचे ठसे बहिरेवाडीच्या दिशेने जात असल्याचे निदर्शनास आले. बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी-नागरीकांतुन भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान गुरुवारी सायंकाळी गव्यांचा एक कळप कासारवाडीच्या पश्चिमेस असणाऱ्या खाडे, घाडगे शेतात ऊस व ज्वारी फस्त करताना शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यांना जंगलात हाकलून लावले रोजच्या या गव्यांच्या कळपाने पिकांचे होणारे नुकसान पाहून येथील शेतकरी हैराण झाले आहेत रात्रभर गव्यांपासून पिकांची राखण करावी लागत आहे यातूनच बिबट्याची भीती नागरिकांना अधिक आहे.
एक वनरक्षकावर गवे आणि बिबट्या कसे रोखणार या परिसरात गव्यांचे कळप, बिबट्या, रान डुकरे यांच्यासह इतर वन्य प्राण्यांचा वावर वाढला असून वन विभागाच्या वनरक्षक श्रद्धा सोनटक्के या एकट्याच वावरत असतात. एक वनरक्षक गवे, बिबट्यापासून शेतकऱ्यांचे रक्षण कसे करणार असा प्रश्न निर्माण होतो.