

Talsande School Ragging Case
राजेंद्रकुमार चौगले
कोल्हापूर : रोज सकाळी नीटनेटका गणवेश घालून, दप्तराचं ओझं पाठीवर लादून हसतमुखाने शाळेत जाणाऱ्या आपल्या पाल्याकडे पाहून प्रत्येक पालकाचा ऊर अभिमानाने भरून येतो. ‘माझं बाळ शाळेत सुरक्षित आहे,’ हा विश्वास प्रत्येक पालकाच्या मनात असतो; पण जेव्हा एखाद्या नामांकित शाळेतील रॅगिंगची किंवा विद्यार्थ्यांमधील हिंसक वादाची बातमी कानावर येते, तेव्हा हाच विश्वास डळमळीत होतो आणि काळजाचा ठोका चुकतो. विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या शाळा खरोखरच मुलांसाठी तितक्या सुरक्षित राहिल्या आहेत का, हा प्रश्न आज प्रत्येक पालकाच्या मनात घर करून आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे येथील एका निवासी शाळेमधील रॅगिंगचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पालकांसह पाहणाऱ्यांच्याही अंगाचा थरकाप उडाला. यामध्ये आठ ते दहा मुले, ज्यांना अद्याप मिसरूडही फुटले नाही, ती मुले दुसऱ्या मुलांना लाथा-बुक्क्या, बॅट आणि बेल्टने बेदम मारहाण करताना झालेल्या किंकाळ्यांनी शाळा परिसर हादरून गेला.
महाविद्यालयीन विश्वात ‘रॅगिंग’ हा शब्द अनेक वर्षांपासून परिचित आहे; मात्र या विकृतीची लागण आता शालेय वातावरणातही झाल्याचे चित्र अत्यंत चिंताजनक असल्याचे तळसंदे येथील घटनेमुळे अधोरेखित झाले आहे. पूर्वी चेष्टामस्करी किंवा थोडी थट्टा इथंपर्यंत मर्यादित असलेली ‘सीनिअर-ज्युनिअर’ संकल्पना आता धोकादायक वळणावर येत असल्याचा जणू हा पुरावाच म्हंटलं, तर वावगं ठरणार नाही. शारीरिक आणि मानसिक छळाचे प्रकार आता ज्ञानमंदिरापर्यंत आले आहेत, हे कटू सत्य मान्य करायलाच हवे.
नवीन दाखल झालेल्या किंवा स्वभावाने शांत असलेल्या मुलांना लक्ष्य करणे, त्यांना नावं ठेवणे, त्यांच्या वस्तू लपवणे, त्यांना एकटे पाडणे, सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल अपमानास्पद लिहिणे किंवा प्रसंगी शारीरिक इजा पोहोचवणे, असे प्रकार सर्रास घडत आहेत. सर्वात भयावह बाब म्हणजे, अनेक मुले भीतीपोटी किंवा ‘चिडवतील’ या शक्यतेने हा त्रास घरी सांगत नाहीत. ती आतल्या आत कुढत राहतात, ज्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि शैक्षणिक प्रगतीवर गंभीर परिणाम होतो. शाळेत जाण्याची भीती वाटणे, अभ्यासात लक्ष न लागणे, एकलकोंडे होणे ही त्याचीच लक्षणे आहेत. मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ शाळेच्या किंवा केवळ पालकांच्या खांद्यावर टाकून सुटणारा नाही. ही एक सामायिक जबाबदारी आहे, जी दोघांनी मिळून उचलायला हवी.
आपली मुलं शाळेत केवळ अक्षरं गिरवण्यासाठी किंवा गणितं सोडवण्यासाठी जात नाहीत, तर ती एक सुजाण, संवेदनशील आणि आत्मविश्वासू नागरिक बनण्यासाठी जातात. त्यांच्या कोवळ्या मनावर भीतीची किंवा अपमानाचा एक जरी ओरखडा उमटला, तरी ती आयुष्यभरासाठी त्यांच्यासोबत राहू शकते. त्यामुळे शाळेची घंटा वाजल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर भीती नव्हे, तर उत्साह दिसावा, यासाठी पालक आणि शाळा या दोघांनीही एकदिलाने आणि अधिक जागरूकतेने काम करण्याची आज नितांत गरज आहे. तेव्हाच प्रत्येक मूल हसतमुखाने शाळेत जाईल आणि तितक्याच आनंदाने घरी परत येईल, असे वातावरण निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले, तर तळसंदे येथे झालेल्या रॅगिंगसारख्या प्रकारांना आळा बसेल.
आपल्या मुलांशी रोज किमान पंधरा मिनिटे मनमोकळा संवाद साधा. ‘शाळेत काय गंमत झाली’ या प्रश्नासोबतच ‘कोणी त्रास तर देत नाही ना?’ हे विचारण्याची सवय लावा. मूल अचानक शांत झाले असेल, शाळेत जायला टाळाटाळ करत असेल किंवा त्याच्या शरीरावर काही जखमा दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. विश्वासात घेऊन त्याच्याशी बोला. कोणी त्रास दिला, तर न घाबरता मला किंवा शिक्षकांना सांग,’ हा विश्वास मुलांच्या मनात निर्माण करणे आवश्यक आहे. तक्रार केल्याने काहीही वाईट होणार नाही. उलट मदतच मिळेल, हे त्यांना पटवून द्या. थोडा जरी संशय आला, तरी थेट शाळा प्रशासनाशी आणि वर्गशिक्षकांशी संपर्क साधा.
रॅगिंग किंवा कोणत्याही प्रकारच्या छळाविरोधात शाळेने ‘झीरो टॉलरन्स’ धोरण अवलंबायला हवे. अशा कृत्याला पाठीशी घातले जाणार नाही, हा स्पष्ट संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला हवा. यासाठी शाळेत नियमितपणे समुपदेशकांकडून सत्रे आयोजित करायला हवीत. रॅगिंग म्हणजे काय, त्याचे परिणाम काय आणि त्याला बळी पडल्यास काय करावे, याबद्दल मुलांना माहिती द्यावी. तसेच शाळेच्या आवारात विशेषतः मधल्या सुट्टीत किंवा शाळा सुटण्याच्या वेळी शिक्षकांची आणि कर्मचाऱ्यांची कडक देखरेख असणे गरजेचे आहे. मुला-मुलींना न घाबरता आपली तक्रार मांडता यावी, यासाठी शाळेत ‘तक्रार पेटी’ असावी आणि त्यातील प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली जावी.