

कोल्हापूर : या दिवाळीत कोल्हापुरातील अवनि संस्थेतील अनाथ आणि निराधार बालिका आपल्या छोट्या हातांनी आकाशकंदील, पणत्या आणि शुभेच्छा बॉक्स तयार करून दिवाळीचा उजेड स्वतः निर्माण करणार आहेत. प्रकाशाच्या या सणात त्यांच्याही आयुष्यात उजेड फुलवण्याचा हा प्रयत्न समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
गेल्या 33 वर्षांपासून अवनि संस्था अनाथ, निराधार आणि वंचित बालकांच्या शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने संस्थेचे कार्य सातत्याने सुरू आहे. या मुलींना केवळ शिक्षण नव्हे, तर स्वावलंबनाचंही धडे देण्यासाठी संस्थेत कमवा आणि शिका हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमातून मुलींनी आपल्या कल्पकतेच्या आणि मेहनतीच्या जोरावर पर्यावरणपूरक आकाशकंदील, पणत्या, सुगंधी सेंट, शुभेच्छा बॉक्स अशा सुंदर वस्तू तयार केल्या आहेत.