

Kolhapur Panhala mosque encroachment
कोल्हापूर : पन्हाळा येथील सादोवा तलावानजीक मशिदीचे बांधकाम २४ तासांत उतरवून घेण्याच्या पन्हाळा नगरपालिकेच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या डिव्हिजन बेंचने शुक्रवारी तात्पुरती स्थगिती दिली. पन्हाळा नगरपालिकेला १५ जूनपर्यंत भूमिका मांडण्याचे आदेश देण्यात आले. न्यायमूर्ती माधव जमादार आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या बेंचने आदेश दिले आहेत
पन्हाळगडावरील सादोबा तलाव हेरिटेज असून यामध्ये अनधिकृतपणे मशिदीचे बांधकाम करण्यात आल्याचा आक्षेप हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला आहे. हे अनधिकृत बांधकाम उतरवून घेण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली असून जिल्हा प्रशासनाने याबाबत पन्हाळा नगर परिषद आणि पन्हाळा तहसीलदार यांना तपासणी करून निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
पन्हाळा नगर परिषद, पन्हाळा तहसीलदार यांच्या वतीने या मशिदीच्या बांधकामाबाबत सुनावणी होऊन पुरावे तपासण्यात आले. मोजणीही करण्यात आली. सुनावणीअंती मशिदीचे बांधकाम अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले. पन्हाळा नगरपालिका प्रशासनाने मशिदीचे बांधकाम उतरवून घेण्याचे आदेश दिले होते.
शनिवारी (दि.९) प्रशासनाकडून मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात येणार होती. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पन्हाळगडावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने संपूर्ण गड परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये कडक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते.